– दर्शनासाठी भाविक-भक्तांची उसळली गर्दी; उद्या किनगावराजाकडे प्रस्थान
सिंदखेडराजा/बिबी (ऋषी दंदाले) – शेगावनिवासी संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आज (दि.१६) बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या प्रवासाचे आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे भाविक-भक्तांनी टाळ-मृदंगाच्या गजरात जोरदार स्वागत केले. शहरातील विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयात हा पालखी सोहळा मुक्कामी असून, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक-भक्तांची मोठी राग लागली होती. उद्या पहाटे पाच वाजता हा दिंडी सोहळा किनगावराजाकडे प्रस्थान ठेवणार आहे.
विदर्भाच्या पावन भूमीत आणि मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत या पालखी सोहळ्याचे पारंपरागत स्वागत करण्यात आले. यावेळी सिंदखेडराजावासीयांनी एकच गर्दी केली होती. पालखीचे स्वागत व गजानन महाराज यांच्या दर्शनाची सर्वांना आस लागलेली होती. याप्रसंगी विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालखीचे स्वागत करत दर्शन घेतले. रस्त्याच्या दुर्तफा चहा-फराळ पाण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी अनेकांनी आपली सेवा संत गजाननांच्या चरणी अर्पण केली. रात्री रामेश्वर मंदिर समितीच्यावतीने दिंडीत सहभागी वारकरी व भाविकांना भोजनदान करण्यात आले. त्यानंतर हा सोहळा विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयात विसावला. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. तसेच, विविध भजनेही गायली जात होती.
पालखी सोहळ्याचा उद्याचा मुक्काम बिबी येथे असून, तेथे जय्यत तयारी झाली आहे. त्यानंतर किनगावजट्टू, लोणार, सुलतानपूर, मेहकरमार्गे पालखी सोहळा शेगावकडे जाणार आहे. २३ जुलैरोजी पालखी सोहळ्याचा खामगाव येथे अंतिम मुक्काम असून, २४ तारखेला पालखी सोहळा स्वगृही म्हणजे शेगाव येथे परतणार आहे. या पालखी सोहळ्यासोबत पावसाची संततधारही काही भागात सुरू असल्याने शेतकरी सुखावला असून, संत गजानन महाराज येताना पाऊस घेऊन आल्याचा आनंद भाविक व शेतकर्यांच्या चेहर्यावर दिसत होता.
उद्या १७ जुलैरोजी किनगावराजा येथे आगमन व बिबी येथे मुक्काम. १८ जुलैरोजी किनगावजट्टू येथे आगमन व लोणार नगरीत मुक्काम. १९ जुलैरोजी सुलतानपूर येथे आगमन व सारंगधरांच्या मेहकरनगरीत मुक्काम. २० जुलैला नायगाव दत्तपूर येथे आगमन व जानेफळ येथे मुक्काम. २१ जुलैला वरवंड येथे आगमन व शिर्ला नेमाने येथे मुक्काम. २२ जुलैला विहिगाव येथे आगमन व आवार येथे मुक्काम. २३ जुलैला खामगाव येथे आगमन व मुक्काम. तर २४ तारखेला शेगावी पालखी सोहळा दाखल होईल.
————-