BULDHANACrimeHead linesVidharbha

बुलढाण्यातील खंडणीप्रकरणाला धक्कादायक वळण; पंकज खर्चे यांचा नातेवाईकच निघाला आरोपी!

– बुलढाणा पोलिसांनी आवळल्या दोघा तरूणांच्या मुसक्या; ‘युट्यूब’वरून सूचली खंडणीची आयडिया!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शहरातील व्यावसायिक पंकज अरुण खर्चे यांना तब्बल ४० लाखांची खंडणी दिल्लीतील गँगस्टरच्या नावाने मागण्यात आली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. परंतु, कुख्यात गँगस्टरच्या नावाने खंडणी मागणारा आरोपी हा बुलढाण्यातीलच निघाला असून, विशेष म्हणजे तो फिर्यादीचा नातेवाईक निघाला आहे. बनावट गँगस्टर बनून या युवकाने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्याच नातेवाईकांकडे तब्बल ४० लाखाची खंडणी मागितली होती. दिल्लीतील बवाना नामक एका गँगस्टरच्या बाबत युट्यूबवरून माहिती घेऊन त्याच पद्धतीने आरोपीने हे कृत्य केले.

दिल्लीच्या कुख्यात गँगस्टर नीरज बवानाच्या नावाने बुलढाणा शहरातील केशव नगर भागातील पंकज अरुण खर्चे यांना तब्बल ४० लाखांची खंडणी मागितली गेली होती. पैसे न दिल्यास ‘गेम’ करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने (डिबी) अवघ्या तीन दिवसांत उपरोक्त गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले असून, या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या साहाय्याने दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, या खंडणीखोर आरोपीचा शोध घेण्यासाठी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या घटनेकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी बुलढाणा पोलिसांवर मोठा दबाव होता.

पकडण्यात आलेल्या आरोपीपैकी एकजण हा फिर्यादी पंकज खर्चे यांचा जवळचा नातेवाईक आहे. आरोपी आदित्य सुरेश कोलते ( वय १८) आणि ऋषीकेश अनिल शिंदे (वय १८), अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. आदित्य हा फिर्यादीचा खर्चे यांचा जवळचा नातेवाईक आहे. तर दुसरा आरोपी ऋषीकेश शिंदे हा किन्होळा येथील रहिवासी असून, दोन्ही आरोपींनी आयटीआय केलेले आहे. आरोपी आदित्य कोलते हा सोशल मीडियावर सक्रीय होता. हातबॉम्ब कसे बनवायचे,  देशात नामवंत गँगस्टर कोण कोण आहेत, विविध गोल्डमॅनला फॉलो करणे, असाच उद्योग त्याने केल्याचे त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून दिसून आले आहे. फिर्यादी खर्चे यांनी पुणे येथे ४० लाख रुपयांचा फ्लॅट घेतला. त्यामुळे त्यांच्याकडे बक्कळ पैसा असल्याची या दोन आरोपींची खात्री झाली होती. त्यामुळे त्यांनी खर्चे यांना ब्लॅकमेल करण्यासाठी गँगस्टर बावना याच्या नावाने फोन करून ४० लाखाची खंडणी मागितली.


बुलढाणा शहरातील केशव नगर भागात वास्तव्यास असलेले म्युचल फंड डिस्ट्रिब्युटर पंकज अरुण खर्चे (वय ४२) यांच्या मोबाईलवर ८ जुलैच्या सायंकाळी ५.३५ वाजता दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. मला तुझी सगळी कुंडली माहीत आहे. मला ४० लाख रुपये दे, तू जर पैसे दिले नाही, तर मी तुझा गेम करुन टाकीन, अशी धमकी दिली.  दरम्यान, ९ जुलैच्या सकाळी ६.१५ वाजता दरम्यान झोपेतून उठून अंगणात गेले, त्यावेळी त्यांच्या कारच्या मागील बाजूची काच फुटलेली दिसली. तसेच कारजवळ २ दगडाखाली ठेवलेली एक धमकीची चिठ्ठी दिसली. त्यांनी चिठ्ठी वाचून पाहिली असता, तिच्यावर ‘मैने तुझे फोन किया था, मैं निरज बवाना का राइट हैंड हु, मै तुम्हे ३ दिन का टाइम देता हु, ४० लाख रूपये दे और छुट जा, पैसे नहीं दिया तो तेरे घर में बिवी और तेरी २ बेटी रहती है, सबका गेम कर दुंगा’, अशा आशयाच्या हिंदी भाषेत धमक्या लिहलेल्या दिसल्या. या प्रकरणी पंकज खर्चे यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!