Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

सिंदखेडराजा विकासासाठी १६८ कोटी तर संग्रहालयाच्या विकासासाठी ३४ कोटी मिळणार!

– जिल्हास्तरीय समितीने चर्चा करून परिपूर्ण आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा; ना. मुनगंटीवार

बुलढाणा (संजय निकाळजे) – सिंदखेडराजा येथील विकासासाठी १६८ कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून, संग्रहालयाच्या विकासकामांसाठी ३४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या स्थळाचे आगळेवेगळे महत्व आहे. येथील ऐतिहासिक वास्तूंचे महत्व लक्षात घेऊन त्याच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करावा. जिल्हास्तरीय समितीने विविध विभागांशी चर्चा करून विविध विकास कामांचा अंतर्भाव असलेला परिपूर्ण विकास आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासासंदर्भात आज मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आ. राजेंद्र शिंगणे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व संचलनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बुलडाणा जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सिंदखेडराजा येथे सहा राज्य संरक्षित स्मारके आणि पाच केंद्र शासन संरक्षित स्मारके अथवा ठिकाणे आहेत. यामध्ये राजे लखुजी जाधव राजवाडा, निळकंठेश्वर मंदिर, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सावकार वाडा, रंगमहाल, काळा कोट, मोती तलाव, रामेश्वर मंदिर, चांदणी तलाव, सजना बारव आदी ठिकाणांचा समावेश आहे. या स्थळांसह परिसर विकासाच्या बाबतीत एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक स्थळांचे महत्व लक्षात घेतच तेथील कामांचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी स्थानिक यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाहीच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.


सध्या या स्थळांच्या विकासासाठी १६८ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय, तेथील संग्रहालयाच्या विकासकामांचा ३४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, या परिसराचे आणि स्थळाचे महत्व लक्षात घेता, विविध यंत्रणांच्या मदतीने एकत्रित असा आराखडा आवश्यक आहे. त्यादृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही जिल्हा प्रशासनाला याबाबत काही सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!