– ठाकरेंची टीका जिव्हारी, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंचे बॅनर्स फाडले, काळे फासले!
नागपूर (जिल्हा प्रतिनिधी) – सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. ते नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर सभेतून हल्ला चढविला. नागपुरात येऊन ठाकरेंनी फडणवीस यांना आस्मान दाखविल्याने या जाहीर सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, अशी टोलेबाजीही ठाकरेंनी केली. या टीकेनंतर नागपुरात भाजप आक्रमक झाला असून, नागपूर विमानतळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागली होती. ही होर्डिंग भाजप कार्यकर्त्यांनी फाडली आणि होर्डिंग पायदळी तुडवले. एवढेच नाही तर पोस्टरला काळे फासत भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध नोंदवला.
अरे तुमच्या नागपूरला कलंक आहे हा.. नाही नाही नाही म्हणजे हो हो हो असा त्याचा अर्थ!
– श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख pic.twitter.com/GVxpu4Agz2
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 10, 2023
नागपूर येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले, की ‘देवेंद्र फडणवीस यांची हालत विचित्र झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. झालं आहे काही तरी नक्की पण सांगण्यासारखं नाहीये. उपमुख्यमंत्र्यांची एक क्लिप आहे. मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण दोन जणांना घेऊन आलो, असं ते म्हणत आहेत’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. चाय पे चर्चाच्या धर्तीवर ‘होऊन जाऊ दे चर्चा’ अशी नवी मोहीम सुरू करण्याचे आवाहन ठाकरेंनी शिवसैनिकांना केले. उध्दव ठाकरे म्हणाले की, ”आमचे हिंदुत्व स्वच्छ आहे. आपला हिंदू धर्म स्पष्ट आहे. अशा गद्दारांना आमचा हिंदुत्वात स्थान नाही. ‘मुँह में राम और बगल में छुरी’ हे आमचे हिंदुत्व नाही. आम्ही राम-राम म्हणत आणि इतरांना मारत राहणे हे आम्ही करत नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी भगवा झेंडा फाडण्याचा प्रयत्न केला. भगव्या झेंड्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गद्दारी आहे. धनुष्यबाणावर संशय निर्माण करण्याचे काम तुम्ही केले. हा रामाचा विश्वासघात आहे. तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, पण गद्दारांना दिलेले धनुष्यबाण म्हणजे प्रभू रामासोबत गद्दारी आहे.
“आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणारे नाही आहे. हिंदुत्वाच्या पायावर पहिली कुऱ्हाड २०१४ साली भाजपाने मारली आहे. याचं मला वाईट वाटतं. मला पटत नाही, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तरी पटतं का? ज्या दिशेला हिंदुत्व घेऊन जात आहेत, ते स्वयंसेवक संघाला मान्य आहे का?” असा सवालही ठाकरेंनी केला.
“२०१४ साली भाजपाने आमच्याबरोबरची युती तोडली. तेव्हा युती का तोडली? त्यावेळी मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि आजही तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, आमची नाही,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून ठाकरेंवर टीकेचा भडिमार सुरू झाला होता. फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत, तुम्हाला कलंकाची कावीळ झाल्याचे फडणवीस ठाकरेंना म्हणाले. दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही उद्धव ठाकरेंना सुनावले. ‘उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही,’ असे गडकरी म्हणाले.
—————