पक्ष संघटन दिल्ली, मुंबईतून पदे आणून नाही तर गल्लीतील कामाने वाढते : हर्षवर्धन सपकाळ
– पक्षवाढीसाठी बूथ कमिट्या सक्षम करणे गरजेचे – राहुल बोंद्रे
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – दिल्ली, मुंबईची विमानाची तिकिटे काढायची अन् तिकड़ून वरिष्ठांच्या शिफारशीने नियुक्तीपत्र आणून जिल्ह्यात मिरवल्याने पक्ष वाढत नाही, असे जिल्ह्यातील काही नेत्याकड़े अंगुलीनिर्देश दाखवत, यासाठी गल्लीत काम करून गाव पातळीवर पक्ष मजबूत करावा लागतो, असे रोखठोक मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. तसेच, अजित पवार गटात प्रवेशाचे खापर आ.ड़ॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काँग्रेसवर फोड़ल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव आजच्या देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर तालुका काँग्रेसच्या सभेत घेतला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मेहकरच्या सभेतही सदर ठराव संमत करण्यात आला.
देश लुटा अन् त्यातून इलेक्शन जिंका, हीच नीती भाजपची राहिली असा आरोप करत, फोड़ाफोड़ी व पळवापळवीमुळे इतर पक्षांवर आता जनतेचा विश्वास राहीला नसून सक्षम पर्याय म्हणून आता काँग्रेसकडे पाहिले जाते. त्यामुळे पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले. पक्षसंघटन मजबूत करण्याचे दृष्टीने जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा दौर्यावर असून, याचाच भाग म्हणून मेहकर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज, १० जुलैत रोजी मेहकर येथील सेंटर प्लाझा येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, माजी सभापती नंदू बोरे, जेष्ठ नेते दिगंबर मवाळ, काँग्रेस नेते शैलेश सावजी, माजी तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, समन्वयक दिलीप जाधव आदींनी विचार व्यक्त केले.
यावेळी प्रदेश सचिव दादूशेठ, माजी सभापती अशोकराव पड़घान, अतुल शिरसाट, समन्वयक सुनील सपकाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे, चित्रांगण खंड़ारे, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर धाबे, कलीमखान, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, माजी उपसभापती सतिश ताजने, प्रा.ओम गजभिये यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील कार्यकर्ते पक्षासाठी राबराब राबत असताना त्यांच्याकड़े नेते लक्ष देत नसल्याची खंत सेवादलाचे प्रदीप देशमुख व किसान काँग्रेसचे विनायक टाले यांनी यावेळी बोलून दाखविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी केले. संचालक राजेंद्र गायकवाड़ तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष पंकज हजारी यांनी केले. पेरणीचे दिवस असतांना ही बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.