Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

‘मविआ’तील समावेशाबाबत १५ दिवसांत कळवा; आंबेडकरांचा ठाकरेंना ‘अल्टिमेटम’!

– आंबेडकरांकडून अजितदादांचे तोंडभरून कौतुक : ‘अजित पवार म्हणजे पोटात, ओठात एक असलेला नेता’!
– आंबेडकरांशी आघाडीबाबत काँग्रेस अन् ‘बीआरएस’ची बोलणी सुरू!

अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – महाविकास आघाडीतील समावेशाबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला येत्या १५ दिवसांत काय ते एकदाचे कळवावे. १५ दिवसानंतर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीबद्दल आंबेडकर यांनी अजितदादांचे कौतुक केले. अजित पवार ‘जे ओठात, तेच पोटात असणारा नेता’ असल्याचे म्हणत आंबेडकरांनी अजितदादांच्या निर्णयाचे कौतुक केले. दरम्यान, आंबेडकर यांच्यासोबत बीआरएस व काँग्रेस या दोन्ही पक्षांची बोलणी सुरू असल्याने उद्धव ठाकरे येत्या १५ दिवसांत काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. त्यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणे झाले आहे, हे स्पष्ट करावे. आता निवडणुकाजवळ आहे. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट करत, वेळकाढू भूमिका घेणार्‍या उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे इच्छुक असून, तसे निरोप आंबेडकरांना मिळाले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसनेदेखील आंबेडकरांसोबत चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनी आंबेडकरांना फोन करून आघाडीसाठी साद घातली होती. परंतु, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी यांची वैयक्तिक पातळीवर युती झालेली असून, महाविकास आघाडीतील समावेशाबाबत उद्धव ठाकरे हे महाआघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार होते. त्यांनी ती चर्चा केली की नाही, याबाबत अद्याप ठाकरेंच्या बाजूने काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

उद्धव ठाकरे हे सातत्याने या संदर्भात वेळकाढू भूमिका घेत असल्याने, प्रकाश आंबेडकर यांनी आजअखेर त्यांना अल्टिमेटम देत, १५ दिवसांचा वेळ दिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. प्रबोधनकार ठाकरे व बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे नातू एकत्र आल्याचे सर्वांनी स्वागत केले होते. त्यामुळे राज्याचे सामाजिक चित्र पाहाता, त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेण्यास वेळ लावला तर मात्र, आंबेडकर त्यांच्यासोबतची युती तोडू शकतात. त्याचा फटका सद्याच्या राजकीय परिस्थितीत ठाकरेंना बसू शकतो, असे राजकीय धुरिणांचे मत आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!