पंकजा मुंडे महाकालेश्वरांना शरण; महाराष्ट्रात काँग्रेस प्रवेशाची चर्चा!
– धनंजय मुंडेंच्या भाजपसोबत जाण्याने बीडच्या राजकारणात पंकजांची गोची!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी रात्री उज्जैन येथील महाकालेश्वरांना शरण जात, रात्री पूर्जाअर्चा केली. तसेच, तेथील नंदीच्या कानात आपली ईच्छाही बोलून दाखविली. पंकजा या महाकालेश्वरांना शरण गेल्या असतानाच, इतके महाराष्ट्रात त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली होती. पंकजा व राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाल्याचे वृत्त राज्यात धडकले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य केल्याने या चर्चेला आणखीच उधाण आले. पंकजा यांचे राजकीय विरोधक व बंधु धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत भाजपसोबत गेल्याने बीडच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. पंकजांचे राजकारण धोक्यात आले असून, त्यांनी आता तरी भाजप सोडावा, यासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव वाढला आहे. त्यामुळे त्या काँग्रेस या राष्ट्रीय पक्षात किंवा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर शिवसेना (ठाकरे) या पक्षात सहभागी होऊ शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
विधायक पंकजा मुंडे ने टेका महाकाल मंदिर में माथा@Pankajamunde #MahakaleshwarTemple #Ujjain pic.twitter.com/K1YQFQeFca
— Desh Sharma (@DeshSharma333) July 5, 2023
बुधवारी रात्री पंकजा मुंडे-पालवे या अचानक उज्जैन येथे महाकालेश्वर भगवान यांच्या मंदिरात पोहोचल्या. तेथे त्यांनी मंदिर समितीच्या निर्णयाचे पालन करत, बाहेरूनच नंदीमंडपातून महाकालेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधीवत पूजादेखील केली. तसेच, महाकालेश्वरांच्या नंदीच्या कानात आपली इच्छा बोलून दाखविली. महाकालेश्वरांच्या दर्शनापूर्वी त्या आगर मालवा जिल्ह्यातील प्रसिद्ध तंत्रविद्येचे जागृतस्थळ असलेल्या मॉ बंगलामुखी मंदिरातही पोहोचल्या. तेथे त्यांनी देवीचे अनुष्ठानही केले. नलखेडा मॉ बगलामुखी या तांत्रिकदेवीच्या आशीर्वादाने राजकीय इच्छा पूर्ण होतात, असा समज आहे. इकडे पंकजा या देवीदेवतांना शरण गेल्या असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा जोरात रंगली होती.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडे यांच्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचेही सांगण्यात आले. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, त्यांनी यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तथापि, पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असे पटोले यांनी सांगितले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
मंत्री धनंजय मुंडे हे भाजपसोबत गेल्याने पंकजांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन पक्ष सत्तेत आहेत. २०२४च्या निवडणुकीत परळी विधानसभेची जागा मंत्री धनंजय मुंडे यांना सोडणे क्रमप्राप्त असून, त्यामुळे पंकजा यांना नवीन मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवासाठी ज्यांनी पक्षांतर्गत प्रयत्न केले (?) व नंतरही सातत्याने त्यांचे राजकीय खच्चीकरण सुरूच आहे, ते पाहाता पंकजा मुंडे यांनी तातडीने भाजप सोडावे व काँग्रेस किंवा शिवसेना (ठाकरे) या पक्षात प्रवेश करावा, यासाठी त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी दबाव वाढविलेला आहे. त्यानुसार, राज्यात परत आल्यानंतर त्या काय निर्णय घेतात, याकडे भाजपसह त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागलेले आहे.
भाजपमधील अंतर्गत राजकारणाला व पायखेचण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून स्व. गोपीनाथ मुंडे यांनीदेखील भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री व स्व. मुंडेसाहेबांचे जीवलग मित्र स्व. विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. परंतु, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भाजपचा संसदेतील नेता फोडून पक्षात घेणे व त्यांना मंत्रिपद देणे, ही बाब त्यांच्या नैतिकतेला पटली नव्हती. परिणामी, स्व. मुंडे यांना भाजप सोडता आले नव्हते. त्यामुळे स्व. मुंडे साहेबांचे स्वप्न पंकजा मुंडे-पालवे या पूर्ण करतात की काय, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
———–