BULDHANAHead linesVidharbha

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात झळकणार शिव’आज्ञापत्र’!

बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या पुढाकाराने वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सोळाव्या शतकातील ‘आज्ञापत्र’ सर्व पोलीस ठाण्यांच्या दर्शनी भागात झळकणार आहे. वृक्षप्रेमी मित्र मंडळाच्या मागणीचे हे फलीत आहे.

वृक्षतोड हा चिंतनाचा व चिंतेचा विषय असून, बेसुमार वृक्षतोड होत असल्याने निसर्गाचा समतोलदेखील ढळला आहे. निसर्गचक्र सुरळीत राहण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी आदेश म्हणजे आज्ञापत्र काढून वृक्षांचे महत्त्व सांगितले. त्यांचे संगोपन कसे ते सांगितले. हे आज्ञापत्र बुलढाणा येथील वृक्षप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ तथा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना भेट दिले. ही अनोखी भेट पोलीस अधीक्षक यांना भावली. या आज्ञापत्राचे वाचन केल्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा सर्व पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस दलातर्पेâ प्रत्येक ठाण्यात दर्शनी भागात लावण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. यावर लवकरच अमल केला जात आहे. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी उपस्थित होते. पत्रकार वृक्ष मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांच्याशी पोलिस अधीक्षकांनी दीर्घ संवाद साधला. शिवाजी महाराजांचे विचार काळाच्या कितीतरी पुढे होते, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. यावेळी पत्रकार गणेश निकम, रणजीत राजपूत, सोहम घाडगे, शौकत शहा, राम हिंगे, प्रा.जगदेवराव बाहेकर, गोपालसिंग राजपूत, अनंता लहासे, विजय घ्याळ, दिलीप मोरे, वृक्षमित्र डांगे, आदी वृक्षप्रेमी यांची उपस्थिती होती.


पोलीस दलाच्या सहकार्याने लवकरच कार्यक्रम – डॉ. शोण चिंचोले

शिवजयंती आणि पोलीस दल यांच्या सहकार्याने सामाजिक एकतेसाठी लवकरच भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कडासने व डॉ. चिंचोले, सुनील सपकाळ, रणजित राजपूत यांनी नियोजन केले आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!