भाजपचे ‘मिशन अजितदादा’ फत्ते!
UPDATE
५ जुलैला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक
- एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्याच पाठिशी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या आमदारांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली आणि विधानभवनात जाऊन शपथ घेतली. तुम्ही जे पाहिलं तेच आम्ही पाहिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यात शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे, असं मी स्पष्ट करतो, असं जयंत पाटील म्हणाले.
- अजित पवार यांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान विरोधीपक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
- राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आज शपथ घेतली. मला आनंद आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला, ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त केले. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला. राष्ट्रवादी पक्षाची 6 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली लवकरच समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं त्यापैकी काही जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले, याची आठवण पवारांनी करुन दिली.
– छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरेंनीही सोडली शरद पवारांची साथ?, सर्वांची मंत्रिमंडळात वर्णी
– महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारप्रणित मोठा राजकीय भूकंप??
मुंबई (पुरुषोत्तम सांगळे) – ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने २९ जूनरोजी राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत दिलेली बातमी
https://breakingmaharashtra.in/eknath_shinde_delhi-2/
खरी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे अखेर भाजपच्या गळाला लागले असून, भाजपचे ‘मिशन अजितदादा’ हे फत्ते झाले आहे. अजित पवारांनी आपल्या आठ समर्थक आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्य मंत्रिमंडळात अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले असून, त्यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार हे मंत्री झालेले आहेत. या सर्व आमदारांना राज्यपालांनी मंत्रिपदाची पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजितदादांसोबत गेलेले सर्व आमदार हे शरद पवार यांच्या खास मर्जीतील असल्याने हा राजकीय भूकंप शरद पवारप्रणित (?) असल्याची जोरदार चर्चा राजधानी मुंबईत सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिकयुद्ध चालू होते. ते वाकयुद्ध म्हणजे, अजितदादांना भाजपसोबत जाण्यासाठीचे ‘कव्हर फायरिंग’ होते, अशीही राजकीय चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, विकासाला प्राधान्य द्यावे म्हणून हा निर्णय घेतला आहे. अजून मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदार माझ्यासोबत असून, मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिली होता. राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली. या उलथापालथीचे संकेत टब्रेकिंग महाराष्ट्रटने २९ जुलैरोजीच दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुपारी अडिच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याप्रसंगी राजभवनात विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील उपस्थिती होती. अजितदादांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदारदेखील राज्य मंत्रिमंडळात सहभागी झाले असून, त्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील आणि ‘ईडीच्या फेर्यात’ अडकलेले हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. या सर्वांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाटण्यात विरोधी पक्षासोबत ‘डायस शेअर’ करणे, व राहुल गांधी यांचे समर्थन करणे हा एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे आम्ही भाजपसोबत जात आहोत, असे गंमतीशीर कारण या सर्व आमदारांनी दिले आहे.
दरम्यान, अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते व प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सांगितले, की आपली शरद पवार यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. ‘त्यांनी सांगितले की, आपल्याला लोकांचे व पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा पाठिंबा असून, आपण व राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यासोबत मजबुतीने उभे आहोत. आपण पुन्हा एकदा पक्ष उभा करू’, असेही पवार म्हणाल्याचे खा. राऊत यांनी सांगितले. दरम्यान, ‘आमच्या सरकारला आता तिसरे इंजिन मिळाले असून, आपले ट्रीपल इंजिन सरकार आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
अजित पवार यांनी आज सकाळी अचानक आपल्या समर्थक आमदारांना आपल्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बोलावले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या, असे सूत्राने सांगितले. या बैठकीनंतर अजित पवार व आठ आमदार हे राजभवनावर पोहोचले. या सर्व घडामोडी सुरू असताना पक्षाध्यक्ष शरद पवार हे पुण्यात होते. या घडामोडींबाबत त्यांना विचारणा केली असता, या बैठकीबाबत आपल्याला माहिती नाही. ते (अजितदादा) विरोधी पक्षनेते असल्याने अशी बैठक ते घेऊ शकतात. शरद पवार हे या सर्व घडामोडींबाबत अनभिज्ञ असले तरी, त्यांच्या मर्जीनेच हा राजकीय भूकंप घडला असल्याची जोरदार राजकीय चर्चा मात्र मुंबईत सुरू आहे.
अजित पवारांबरोबर गेलेल्या काही सहकाऱ्यांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आमची वेगळी भूमिका आहे, असं त्यांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रवक्ता महेश तपासे यांनी दिली आहे. तर ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, वरिष्ठस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची प्रक्रिया विधानसभा अध्यक्षांना पार पाडावी लागणार असून, त्यामुळे सरकारला स्थीर ठेवण्यासाठी अजित पवारांसह आठ आमदार भाजपसोबत गेले आहेत. शिंदे यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, राज्यात यापूर्वी फसलेला ‘पहाटेचा प्रयोग’ आता यशस्वी होणार आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका या देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याच नेतृत्वात लढविल्या जाणार असल्याचे वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्राने सांगितले आहे. भाजपच्या दिल्लीतील ‘हायकमांड’च्या नेतृत्वात ‘मिशन अजितदादा’ हे फत्ते झालेले आहे.
बंडाशी संबंध नाही – शरद पवार
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडाशी आपला काहीच संबंध नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मी खंबीर आहे. लढायला मजबूत आहे, असे पवार यांनी सांगितले. तसेच जे आमदार गेले आहेत. त्यातील 80 टक्के आमदार संध्याकाळपर्यंत परत येतील, असा दावा राष्ट्रवादीने केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आमदार जमू लागले आहेत. जयंत पाटील हे इतर आमदारांच्या संपर्कात आहेत. राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांना भेटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निष्ठावान कार्यकर्ता मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळही अजितदादांच्या पाठीशी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अमोल कोल्हे, सुनील तटकरे यासारखे शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे नेतेही अजित पवार यांच्या साथीला असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटीलही अजितदादांच्या सोबत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यासारखे शरद पवारांचे निष्ठावान नेते या ‘भूकंपा’त सहभागी दिसत नाहीत.
अजून अपडेट बातमी वाचण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत रहा…