Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

बुलढाणेकर ढसाढसा रडले, कुटुंबीयांचा आक्रोश; २४ मृतकांवर सामूहिक अंत्यसंस्कार!

– गुडिया शेख वर मुस्लीम कब्रस्थानात होणार अंत्यविधी!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जळालेल्या मृतदेहांतील आपलं कोण? हे ओळखताही न येणार्‍या मन हेलावणार्‍या परिस्थितीत मृतांच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंरबरडा, बुलढाणा येथील त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमीत एकाचवेळी जळणारे तब्बल २४ मृतदेह हे मनविदिर्ण करणारे दृश्य पाहून अख्खे बुलढाणा शहर निःशब्द झाले; यावेळी डोळ्यातून येणार्‍या आसवांनी प्रत्येकाच्या भावनांची वाट मोकळी करून दिली होती. शिंदे-फडणवीस सरकारचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनाही आपले आश्रू रोखता आले नाहीत. त्यांनी स्वतः सरण रचून दुर्देवी मृतकांना अखेरचा निरोप दिला. पुन्हा एकदा धगधगत्या अग्निज्वालांत हे मृतक पंचतत्वात विलीन झाले.

सिंदखेडराजा येथून जवळच असलेल्या पिंपळखुटानजीक समृद्धी महामार्गावर काल रात्री खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. यापैकी २४ प्रवाशांच्या मृतदेहांवर आज दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमीत हिंदूरितीरिवाजाप्रमाणे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. जळून कोळसा झालेल्या आप्तजनांत आपले नेमके कोण हे ओळखताही येईना, अशा दुर्देवी प्रसंगात सामूहिक अंत्यसंस्कारावेळी सर्व प्रवाशांच्या कुटुंबीयांनी फोडलेल्या हंबरड्यामुळे बुलढाणा शहर हेलावून गेले होते. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः सरण रचून अंत्यविधी पार पाडले. कालपासून ना. महाजन हे बुलढाण्यातच मुक्कामी असून, सर्व परिस्थिती ते योग्यरितीने हाताळत आहेत. नागपूरच्या गुडिया शेख या तरुणीवर मुस्लीम कब्रस्थानात दफनविधी होणार आहे.

जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तीन दिवसांपेक्षा अधिक वेळ ठेवणे कठीण असते. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी मृतदेह ताब्यात देताना येणार्‍या अडचणसंदर्भात नातेवाईकांशी चर्चा केली. सर्वांनी मिळून बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, आज २५ मृतदेहांपैकी २४ जणांवर अंत्यसंस्कार पार पडले. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवलेल्या मृतदेहांना वेगवेगळ्या ५ स्वर्ग रथांद्वारे हिंदूस्मशानभूमीत आणण्यात आले. एकाचवेळी इतक्या मृतदेहांची निघालेली ही अंत्ययात्रा बुलढाणेकर पहिल्यांदाच पाहात होते. ते दृश्य पाहून तसेच नातेवाईकांचा हंबरडा ऐकून प्रत्येकाचे मन हेलावले होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन स्वत: सामूहिक अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. एवढेच नाही तर त्यांनी पुढे येऊन सरणही रचले. अंत्यसंस्कारांच्या विधीदरम्यान त्यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. जवळपास दोन तास इतका वेळ अंत्यसंस्कारसाठी लागला.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर, आ. श्वेताताई महाले, आ. संजय गायकवाड, खा. रामदास तडस, खा. प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, माजी आ. विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, डॉ. पाटील, तहसीलदार खंदारे, मुख्याधिकरी पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने मृतकांचे कुटुंबीय व बुलढाणेकरांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दुःखद संवेदना व्यक्त केल्या. आज सायंकाळपासून नातेवाईकांना अस्थी वितरीत केले जाणार आहेत. ओळख पटली नसल्याने प्रत्येकाची थोडे थोडे अस्थी देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.


विदर्भ ट्रॅव्हल पोलिस उपनिरीक्षकाच्या मालकीची!

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. याचदरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्स ही यवतमाळ येथील दरने बंधूं यांची आहे. अपघातामध्ये जळून खाक झालेली बस पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरने यांच्या पत्नी प्रगती दरने यांच्या नावावर असल्याचे माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच भास्कर दरने आणि त्यांचे भाऊ विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरने हे दोघे अपघातस्थळी रवाना झाले. गाडीची सर्व कागदपत्रे आणि गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र परिपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. चालकाने टायरची हवा तपासली होती असा दावा त्यांनी केला आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!