सरपंच थेट जनतेतून निवडावा : मोहनराव रोकडे
पारनेर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले, ग्रामीण भागाशी घट्ट नाते असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून सरपंचनिवड हा क्रांतिकारी निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केली आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे यांनी दिली.
आघाडी सरकारच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी युती सरकारच्या काळात ग्रामविकासामध्ये काम करणाऱ्या घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून, थेट जनतेतून सरपंचनिवडीचा जो कायदा केला होता, त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला न्याय मिळाला होता. तत्कालीन राज्य सरकारने आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्या समितीच्या शिफारशीनुसार थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरपंच निवड ही जनतेतून करण्यात यावी असे मत अहमदनगर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मोहनराव रोकडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याबरोबर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवडण्याचा आग्रह धरला आणि थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या पद्धतीला खो घातला आणि ही पद्धत रद्द केली. दरम्यानच्या काळात हे विधेयक मागे घेण्यासाठी व सरपंचनिवड थेट जनतेतूनच ठेवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे काकडे, अॅड. विकास जाधव, राज्याचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी राज्यातील सर्व सरपंच यांनी पाठपुराव्यास सुरवात केली. अशी माहिती यावेळी रोकडे यांनी दिली.