सोलापूर (संदीप येरवडे) – शहरातील तीन हजार पटसंख्या असलेल्या महापालिकेच्या कॅम्प शाळा एकमध्ये अक्षरशः विद्यार्थ्यांना घरातून बाटली भरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपयांचे बजेट असलेल्या सोलापूर महापालिकेच्या शाळेमध्ये पाणी मिळत नसल्याचे दुर्देव समोर आले आहे.
एकीकडे ग्रामीण भागामध्ये झेडपीच्या शाळा जोमाने चालतात. परंतु महानगरपालिकेच्या असलेल्या शाळेमध्ये प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांचे हाल होत आहेत. याकडे महानगरपालिकादेखील दुर्लक्ष करीत असल्यामुळे याला जबाबदार येथील लोकप्रतिनिधीही तितकेच आहेत. शहरातील लष्कर भागातील महापालिकेची कॅम्प शाळा एकमध्ये जवळपास तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. हे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. या ठिकाणी मराठी, इंग्रजी आणि उर्दू असे तिन्ही माध्यमाचे वर्ग भरतात. परंतु येथे प्राथमिक सुविधाचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
या आहेत समस्या….
– पाण्याची सोय नाही
– स्वच्छतेचा अभाव
– इमारत दुरुस्त करण्याची गरज
– स्वच्छतागृहामध्ये दगडाचा खच
– सुट्टीमध्ये व रात्री बाहेरील नागरिकांचा त्रास
वास्तविक पाहता, महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयाची कामे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. परंतु महानगरपालिकेच्या या शाळा सुधारण्यासाठी का निधी दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, येथील लोकप्रतिनिधीदेखील खाजगी शाळांना खतपाणी घालत असल्यामुळे महापालिकेची शाळा अक्षरश: अंतिम घटका मोजत आहेत.
माझ्याकडे नुकताच पदभार देण्यात आला आहे. या महापालिकेच्या कॅम्प नंबर एक शाळेमध्ये पाण्याची सोय नसेल तर त्या ठिकाणी सोय करण्यासाठी मी प्रयत्न करतो.
– विठ्ठल ढेपे, मनपा प्रशासनाधिकारी
————