Head linesPachhim Maharashtra

‘केदारेश्वर’च्या अध्यक्षपदी ऋषिकेश ढाकणे; उपाध्यक्षपदी माधव काटे

– ढाकणे कुटुंबातील तिसर्‍या पिढीच्याहाती कारखान्याची सूत्रे!

शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिकेश प्रतापराव ढाकणे तर उपाध्यक्षपदी माधव भिवसेन काटे यांची यांचे आज एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली आहे. या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांची एकहाती सत्ता कायम राहिली आहे.

आज कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण लोखंडे यांनी संचालक मंडळांची बैठक बोलावली होती. अध्यक्षपदासाठी ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांच्या नावाची सूचना पांडुरंग काकडे यांनी मांडली तर शिवाजी जाधव यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी माधव भिवसेन काटे यांच्या नावाची सूचना सदाशिव दराडे यांनी मांडली, त्यास श्रीमंत गव्हाणे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण लोखंडे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे यावेळी सत्कार करून फटाक्याची आतषबाजी करून अभिनंदन करण्यात आले.

नवनिर्वाचीत अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, की अतिशय कष्टातून व प्रतिकूल परिस्थितीतून बबनराव ढाकणे यांनी या कारखान्याची उभारणी केली. प्रतापराव ढाकणे यांनी अडचणीत कारखान्याला ऊर्जितावस्था निर्माण करून दिली. प्रतापरावांनी कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी अक्षरशः रक्ताचे पाणी केले, मात्र कारखाना विकू दिला नाही. मी लहानपणापासून केदारेश्वर कारखान्याच्या संघर्षाचा इतिहास जवळून पहिला आहे. प्रस्थापितांनी या संस्थेला अडचणीत आणून या भागातील शेतकरी ऊस उत्पादक व सभासदांची पिळवणूक केली, हे मी कधीच विसरू शकणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कारखान्याच्या हितासाठी काम करत राहील. मला अतिशय अत्यंत कमी वयात संस्थेची जबाबदारी दिली. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. भविष्यात इथेनॉल उभारणीचा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, त्यासोबतच उपपदार्थ निर्मिती संदर्भातही आपण वाटचाल सुरू करणार आहोत. राज्यातील पहिला हा ऊसतोड मजूर सभासद असलेला साखर कारखाना आहे. त्यामुळे इथे कोणताही निर्णय घेताना सामान्य सभासदांना डोळ्यापुढे घेऊन संस्थाहिताचे निर्णय घेवू. माझ्यावर आदरणीय बबनराव ढाकणे व प्रतापराव ढाकणे यांचे संस्कार आहेत, त्याची पायमल्ली मी आयुष्यात कधीही होऊ देणार नाही, आणि उतणार नाही, मातणार नाही. सभासदांनी दिलेला विश्वासला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही नूतन अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, माधव काटे यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी प्रमोद विखे, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, कुंडलिक घोरतळे, भाऊराव भोंगळे, संचालक डॉ. प्रकाश घनवट, बाळू फुंदे, भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर, अशोक तानवडे, बापूराव घोडके, श्रीमंत गव्हाणे, रणजित घुगे, शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, तुषार वैद्य, त्रिंबक चेमटे, सुभाष खंडागळे, सौ. मिना बोडखे, सौ. सुमन दहिफळे, रमेश गर्जे कार्यकारी संचालक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर तुषार वैद्य यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!