चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई वनविभागाच्या सैलानीजवळील जंगलात अंदाजे २८ वर्षीय तरुणीचा कुजलेल्या व गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात आहे, की गळफास घेऊन आत्महत्या आहे, याचा तपास रायपूर पोलिस करत आहेत.
सविस्तर असे, की पिंपळगाव सराई वन विभागाच्या सैलानी जवळील जंगलामध्ये २८ वर्षीय अनोळखी तरूणीचा कुजलेल्या स्थितीमध्ये मृतदेह आढळला असून, याबाबत पिंपळगाव सराईचे पोलीस पाटील रामेश्वर गवते यांना वनविभागाच्या जंगलाजवळील शेतकर्यांनी १९ जूनरोजी माहिती दिली होती. त्यावरून पोलीस पाटील रामेश्वर गवते यांनी रायपूर पोलीस स्टेशनला या घटनेची फिर्याद दिली. या तरुणीचे प्रेत जंगलामध्ये गिलछडीच्या झाडाला गळफास घेऊन कुजलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. या तरुणीने पाच-सहा दिवसापूर्वी झाडाला गळफास घेतला असावा, किंवा तिची हत्या करून मृतदेह लटकवून दिला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले, पोलीस हेडकॉन्स्टेबल ओम प्रकाश साळवे, पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश पालवे यांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असता, सदर तरूणीने झाडाला पांढर्या रंगाच्या ओढणीने गळफास घेतला असल्याचे दिसते. या तरूणीच्या अंगामध्ये हिरव्या रंगाचे शर्ट व इटकरी रंगाची पॅन्ट, पायामध्ये भुरकट रंगाची चप्पल परिधान केलेली होती. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास रायपूरचे ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश साळवे व ऋषिकेश पालवे हे करित आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
—————-