Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

दोन वर्षेतरी ‘सिद्धेश्वर’ पुन्हा उभा राहणे अशक्य; हजार कोटींचे नुकसान!

राजकारणात उतरण्याचे काडादी यांचे संकेत!

– राजकीय नेत्यांनी सहकार्य केले नसल्याबद्दल केली खदखद व्यक्त

सोलापूर (संदीप येरवडे) – चिमणी पाडल्यामुळे हजारो कामगार, शेतकरी यांची कामधेनु असलेला सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना नेस्तानाबूत झाला. कारखान्याला पुढील दोन वर्षे गाळप करता येणार नाही, अशी खंत कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. तरीही सर्व अडथळ्यांवर मात करून आगामी काळात कारखाना चालू करून दाखवू, असे काडादी म्हणाले. केवळ व्यक्तिद्वेषातून सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी बेकायदा ठरवून जाणीवपूर्वक पाडण्यात आली. त्यास भाजपचे स्थानिक आमदार-खासदार जबाबदार आहेत, असा थेट आरोप करीत, चिमणी पाडल्यामुळे कारखान्याचे सुमारे एक हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची भीतीदेखील काडादी यांनी व्यक्त केली आहे. या प्रश्नावर आपण रस्त्यावरची आणि न्यायालयाची लढाई पुढे नेणार असून, प्रसंगी राजकारणातही उतरण्याची तयारी असल्याचा गर्भित इशारा त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९२ मीटर उंचीची चिमणी गुरुवारी (ता.१५ जून) सोलापूर महापलिकेने कटरच्या साहाय्याने पाडली. त्यानंतर धर्मराज काडादी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी चिमणी वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीदेखील दिली. काडादी म्हणाले, सिध्देश्वर कारखान्याची चिमणी विमानतळाच्या धावपट्टीला अडथळा ठरत नव्हती. ‘डिजीसीए’चा सर्व्हे चुकला होता. त्यामुळेच हायकोर्टाने पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. नव्या अहवालाची वाट न पाहता कारवाई करण्यात आली. चिमणीवर कारखान्याचे गाळप आणि सहवीज निर्मिती प्रकल्प चालायचा. आता नव्याने चिमणी उभारावी लागेल. त्याची जागा शोधणे, नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेणे, यासाठी वेळ लागेल. यात किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. चिमणी उभारल्याशिवाय कारखाना सुरू करणे अशक्य आहे, असेही काडादी म्हणाले. या दोन वर्षाच्या कालावधीत कामगार, शेतकरी यांचे हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे, त्याला भाजपचे खासदार व आमदार जबाबदार आहेत, असा आरोपही काडादी यांनी केला.

श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी वाचविण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. हे प्रकरण उच्च न्यायालयात असले तरी तुम्ही तुमच्या अधिकारात या पाडकामाला स्थगिती देऊ शकता, अशी विनंती केली. मात्र, हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याने मला त्यावर स्थगिती देता येणार नाही. तो ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ होईल, त्यामुळे माझे हात बांधले गेले आहेत, असे धोरण मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले, असे सांगून काडादी यांनी राजकीय नेत्यांकडून आलेले वाईट अनुभवदेखील सांगितले. ३८ मेगावाट क्षमतेची सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी वाचविण्यासाठी अखेरच्या क्षणांपर्यंत प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. परंतु हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात असल्यामुळे त्यावर स्थगिती देता येणार नाही. आपले हात बांधले गेले आहेत, असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, भेट झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट झाली असता, त्यांनी चिमणी वाचविण्यासाठी ज्यांना फोन करायचे होते, ते त्यांनी केले. परंतु उपयोग झाली नाही, अशा शब्दात काडादी यांनी हतबलता मांडली.


दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी फोन करून धर्मराज काडादी यांना पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे. ‘त्यांनी कारखान्याची चिमणी पाडली, आता आपण त्यांना पाडू,’ असा इशाराच पटोले यांनी काडादी यांच्याशी बोलताना दिला. मी येत्या २३ तारखेला सोलापूरला येतो, तुमच्याकडेही येणार आहे, असे पटोले यांनी काडादी यांना सांगितले. त्यामुळे येत्या २३ तारखेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले काय भूमिका घेतात? याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!