बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगाव शहरातील ठेंग हॉस्पिटल येथे २२ वर्षीय विवाहितेने तिळ्यांना जन्म दिला आहे. सपना सचिन जाधव असे या विवाहितेचे नाव असून, ही बाब जिल्ह्यात आश्चर्याची ठरली आहे. या तिळ्यांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश असून, प्रत्येकी एका मिनिटांच्या अंतराने त्यांचा जन्म झाला आहे. त्यासाठी सिजरिंग करावे लागले असून, सद्या आई व बाळांची तब्येत छान आहे. डॉक्टर प्रशांत ठेंग आणि त्याच्या टीमने या तिन्ही बाळांवर उपचार केले आहेत.
खामगाव येथील ठेंग हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत दहा हजाराच्यावर प्रसुती झालेली असून यामध्ये जुळे होण्याचे अनेक प्रकरणे आहेत. मात्र तिळे होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टर डॉ. प्रशांत ठेंग यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तिळ्यांना जन्मदेणारी आई सपना जाधव यांची ही पहिलीच प्रसुती होती. तीन बाळ होतील, असे सोनोग्राफीत कळले होते. त्यामुळे गरोदरपणातच पत्नीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला होता. जन्माला आलेल्या तीनही बाळांचे वजन क्रमश: १ किलो ५०० ग्रॅम, १ किलो ५०० आणि १ किलो ३०० असे आहे. तिळ्यांच्या जन्माने जाधव कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सपना यांच्या सुखरूप प्रसुतीसाठी डॉक्टर प्रशांत ठेंग आणि प्रियांका ठेंग यांनी आपले कसब पणाला लावले होते. या डॉक्टर दाम्पत्याने सपना यांच्यावर विशेष लक्ष ठेवून उपचार केलेत. यामध्ये गर्भ नऊ महिने व्यवस्थित वाढविला, तसेच नऊ महिन्यापर्यंत त्यांच्या गर्भास कोणताही धोका होऊ नये, याची काळजी घेतली. प्रसुतीसाठी काही दिवस कमी असल्यामुळे गर्भाला थोड्या प्रमाणात धोका निर्माण झाला होता. मात्र डॉक्टर प्रशांत ठेंग आणि टीमने या तिन्ही बाळांवर उपचार केले आणि सिजरींगच्या माध्यमाने प्रसुती होऊन तिन्ही बाळ सुखरूप आहेत. तिळे झाल्याने जिल्ह्यातही ही घटना आश्चर्याची ठरली आहे.
—————