Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

बहुतांश मागण्या मान्य; तुपकरांचे आंदोलन स्थगित!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासह अन्य मागण्यांसाठी १६ जूनरोजी मुंबईत होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी साडेपाच वाजता बुलढाणा पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह रविकांत तुपकरांच्या बुलढाणा निवासस्थानी धडक देत, त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर सर्व प्रथम बुलढाणा शहर पोलीस स्टेशन व नंतर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्यांना नेण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशनमध्येच रविकांत तुपकर व जिल्हा प्रशासनाची चर्चा घडवून आणली, त्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

या आंदोलनाच्या धसक्याने पीकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकर्‍यांच्या खात्यावर ७० कोटी रुपये जमा करण्याचे लेखी आश्वासन रविकांत तुपकरांना दिले होते. त्यापैकी ४३ हजार ०५८ शेतकर्‍यांच्या खात्यावर ५६ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहे व उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर दि.१५ जूनपर्यंत संपूर्ण पैसे टाकण्यात येतील, असे लेखी आश्वासन जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिले आहे. तर उशिरा तक्रारी केल्याच्या नावाखाली अपात्र शेतकरी व त्रुटीमध्ये असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर लवकरात-लवकर पैसे जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच एआयसी कंपनीकडे असलेल्या उर्वरित १५ जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यावरही पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी १७४ कोटी रुपये मंजूर असून, यातील ४० कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना आदेश काढून २४ जूनच्याआत वंचित अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची माहिती पोर्टलवर टाकून त्यांना मदत मिळून देण्यासंदर्भात आदेशीत केले आहे. तसेच सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात-लवकर मिळावी, यासंदर्भात शासन स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे. बँकांनी जे अनुदानाच्या पैशाला होल्ड लावले आहे ते तातडीने काढण्याचे लेखी आदेश व सीबीलची अट न लावता १०० टक्के पीककर्ज वाटप १५ दिवसात करण्याचे लेखी आदेश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना काढले आहे.

या चर्चेमध्ये शासनाने बहुतांश मागण्या मान्य झाल्याने मुंबईतील आंदोलन तूर्तास स्थगित करीत असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना दिली. जर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही तुपकरांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!