सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या पाडकामाला सुरुवात!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदा ठरलेली चिमणी न्यायालयाच्या निकालानंतर काढण्याची प्रक्रिया आज प्रशासनाने हाती घेतली आहे. या स्थितीत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. मात्र या चिमणीच्या पाडकामावरून सध्या सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
कारखाना परिसर निर्मनुष्य करण्यात आला असून प्रत्यक्ष पाडकाम करणार्या मजुरांशिवाय अन्य कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिलेला नाही. पत्रकार आणि अन्य कोणालाही फोटो, शूटिंग यासाठी सद्यस्थितीत तरी मज्जाव आहे. साखर कारखाना चोहूबाजूनं पोलीस बंदोबस्त असून याला छावणीचे स्वरूप आले आहे. कारखान्याचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असून येथे उपस्थित कर्मचार्यांचे मोबाईल फोन बंद करण्यात आले आहेत. पाडकाम करण्यास विरोध दर्शवणार्या काही पुढारी मंडळी आणि समर्थकांना पोलिसांनी काल रात्री तसेच आज सकाळी ताब्यात घेतल आहे. येथे उपस्थित पत्रकारांच्या मते आज प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली वेगात आहेत.
सोलापूरची विमान सेवा होटगी रोड विमानतळावरून सुरू होण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्यापैकी सिद्धेश्वर कारखान्यांना उभारलेली को जनरेशनची चिमणी ही एक प्रमुख अडचण आहे. याप्रकरणी सोलापुरातील व्यापारी मंडळींनी एकत्रित येऊन बेकायदा चिमणी संबंधात महापालिका ते सुप्रीमकोर्ट पर्यंत तक्रारी केल्या होत्या. कोर्टाचे वारंवार आदेश, सरकारचा अधूनमधून हस्तक्षेप असे होत गेली आठ वर्ष हे काम रखडले आहे. पूर्वीही एक- दोन वेळा महापालिका प्रशासनाने पाडकामाची जय्यत तयारी केली होती. पण पाडकाम झाले नव्हते. बुधवारी प्रत्यक्ष पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे प्रकार जवळपास चार ते पाच दिवस चालणार आहे. त्यामुळे या चिमणीच्या आजूबाजूला तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान या चिमणीचे पाडकाम थांबावे यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून आडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांना पोलीस प्रशासनाने वेळीच ताब्यात घेतले.