रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात; ग्रामीण पोलिस ठाण्यात आंदोलन मागे घेण्यासाठी अधिकार्यांकडून चर्चेच्या फेर्या सुरू!
– होल्ड काढा, पैसे पूर्ण द्या, तरच आंदोलन मागे घेण्याची तुपकरांची भूमिका
– ग्रामीण पोलिस ठाण्याबाहेर कार्यकर्ते आक्रमक, तुपकरांचे शांततेचे आवाहन
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथील पीकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन शेतकर्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेत, त्यांना तूर्त ग्रामीण पोलिस ठाण्यात ठेवले आहे. तेथे कृषी विभाग, महसूल, पोलिस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत असून, आंदोलन मागे घेण्याची विनवणी करत आहेत. दरम्यान, आज पीकविमा कंपनीने काही शेतकर्यांना पैसे दिले, पण बँकांनी होल्ड लावल्याने ते पैसे शेतकर्यांना काढता येत नाहीत. त्यामुळे तुपकर आणखीच आक्रमक झाले असून, ‘आधी होल्ड काढा, पूर्ण पैसे ट्रान्स्फर करा, तरच आंदोलन मागे घेईल’, अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी काही वेळ मागत असल्याने तूर्तास आंदोलन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तुपकर हे बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यातच होते व प्रशासनाच्या वाटाघाटी सुरू होत्या. दरम्यान, तुपकरांनी आंदोलनाचा प्रयत्न केल्यास तो मोडित काढण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झालेली आहे.
१५ जून पर्यंत शेतकर्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ जून रोजी हजारो शेतकर्यांसह मुंबईत धडक देऊन एआयसी विमा कंपनीच्या २० मजल्यावरील कार्यालयातून खाली उड्या मारु, असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे. त्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर पोलिसांनी तुपकरांना १० जून रोजीच नोटीस बजावली होती. आंदोलन करु नये, असे सूचित केले होते तर आता माघार नाही, जीव गेला तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकरांनी जाहीर केली होती. त्यामुळे आज बुलडाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले व बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले होते. दुसरीकडे, तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचे वृत्त कळताच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे शांततेचे आवाहन तुपकरांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या धसक्याने एआयसी पीकविमा कंपनीने ७० कोटी रुपयांची मदत जाहीर करुन १३ जून रोजी शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवातही केली. १३ जून रोजी ४३ हजार ५८ शेतकर्यांच्या खात्यात ५६ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले असून, उर्वरित रक्कम जमा होणार आहे. परंतु, खासगी व सहकारी बँकांनी पैसे खात्यात जमा होताच त्याला होल्ड लावला. त्यामुळे रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांच्याशी वाटाघाटी करणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर ते चांगलेच खवळले. आधी होल्ड काढा, पीकविम्याचे सर्व पैसे तातडीने ट्रान्स्फर करा, मगच आंदोलन मागे घेतो, अशी तंबी त्यांनी अधिकार्यांना भरली. तर या सर्व कारवाईसाठी थोडा वेळ द्या. आम्ही उद्याच बँकांना होल्ड हटविण्यासाठी पत्र देतो, तसेच पीकविमा कंपनी पैसे ट्रान्स्फर करत आहे, अशी भूमिका प्रशासकीय अधिकार्यांनी मांडली. रात्री उशिरापर्यंत तुपकर यांच्यासोबत प्रशासकीय यंत्रणा वाटाघाटी करत असल्याने, तुपकर हे बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यातच पोलिसांच्या ताब्यात होते.
—————-