BULDHANAHead linesVidharbha

शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे आले अन् रविकांत तुपकरांचे फोन खणाणले!

– एकाच दिवशी ४३ हजार शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले पीकविम्याचे ५६ कोटी!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा देताच पीकविमा कंपनी वठणीवर आली आणि त्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवातदेखील केली आहे. १३ जून रोजी एकाच दिवसात जिल्ह्यातील ४३ हजार ५८ शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून, उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रविकांत तुपकर यांच्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकर्‍यांना ही रक्कम मिळाली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकरी तुपकरांवर फोन व मॅसेजेसद्वारे आभाराचा वर्षाव करीत आहेत. आज दिवसभर रविकांत तुपकर यांचा फोन सारखा खणाणत होता, रविभाऊ तुमच्यामुळेच पैसे मिळालेत, असे आभारही व्यक्त केले जात होते.

१५ जूनपर्यंत शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम न मिळाल्यास १६ जून रोजी हजारो शेतकर्‍यांना घेऊन मुंबईत धडक देऊ आणि एआयसी या विमाकंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक मार्वेâटमधील विसाव्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून उड्या मारु, असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ९ जून रोजी दिला. त्यानंतर अगदी बुलढाण्यापासून मुंबईपर्यंतचे प्रशासन अर्लट झाले. तुपकर इशार देतात तसे वागतात त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या इशार्‍यापुढे एआयसी पीकविमा कंपनी नरमली आणि या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकर्‍यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली. १५ जून २०२३ पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र रविकांत तुपकर यांना १२ जून रोजी दिले. दिलेल्या पत्रानुसार त्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरूवातदेखील केली. मंजूर केलेल्या ७० कोटी रुपयांपैकी ५६ कोटी ७५ लाख रुपये १३ जून रोजी ४३ हजार ५८ शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले. खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झाल्याचे मॅसेज शेतकर्‍यांच्या मोबाइलवर धडकले आहेत. उर्वरित रक्कम १५ जूनपर्यंत वितरीत केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे हे मोठे यश आहे. आर्थिक संकटामुळे पेरणी कशी करावी? या विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांना ऐन पेरणीच्या तोंडावर पिकविम्याची रक्कम मिळाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी फोन कॉल आणि आभाराच्या मॅसेजेसचा तुपकरांवर अक्षरश: वर्षाव केला आहे.


रविकांतभाऊ तुमच्या मुळेच!

१३ जूनच्या सायंकाळपासून शेतकर्‍यांच्या मोबाईलवर पीकविम्याची रक्कम खात्यात जमा झाल्याचे मॅसेजेस धडकू लागले. हजारो शेतकर्‍यांनी त्यांना आलेले मॅसेज जसेच्या तसे रविकांत तुपकरांना पाठवून भाऊ तुमच्या मुळेच हे पैसे मिळाले असे म्हणत आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!