स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह सात जणांविरुद्ध अॅट्रोसिटीसह गुन्हे दाखल
– जानेफळ येथील घटना, मेहकर तालुक्यात खळबळ
मेहकर (अनिल मंजुळकर) – तालुक्यामधील जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत वन विभागाच्या कर्मचारी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह सात आरोपींविरुद्ध अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने मेहकर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
घाटबोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वनविभागाच्या बीट जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील क्षेत्रामध्ये महिला वनरक्षक कर्मचारी व इतर वरिष्ठ अधिकारी शासकीय कर्तव्य बजावत असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टालेसह इतर व्यक्ती दिनांक १२ जून रोजी सदर ठिकाणी गैरकायदेशीर मंडळी जमवून वाईट उद्देशाने महिला कर्मचार्यांचा हात पकडून विनयभंग करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच, फिर्यादीस अश्लील हावभाव करून तिच्या मनात लज्जा पोहोचेल, अशी कृती केली. तसेच फिर्यादीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समक्ष जातीयवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शासकीय कामकाज करण्यास दहशत निर्माण झाल्याप्रकरणी दिनांक १४ जून रोजी दिलेल्या तोंडी कैफियतनुसार जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंडविधानाच्या ३५३, ३५४, १४३, १४३, १४७, १४९, १८६, १८९, ५०६, ५०९, सहकलम ३(१)(र)(ए) अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत क्रिमिनल अमेटअॅक्ट नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर तपास मेहकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहेत.
वनविभागात हाहाकार, जंगल होते उजाड!
मेहकर तालुक्यात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या साटेलोटांमुळे भरपूर प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहे. काही बिटअंतर्गत झाडांची परवानगी पेक्षा जास्त झाडे तोडण्यात आली आहे. जंगल नष्ट होण्यासाठी वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या साटेलोटामुळे वनरक्षकासह महिला कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलल्या जात आहे. या वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी जातीने लक्ष घालून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या वनविभागाच्या प्रकरणात घाटबोरी वनपरिक्षेत्र अधिकार्यांवर कोणती कारवाई होते. याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
माझ्यावरील दाखल झालेले गुन्हे राजकीय दबावापोटी – डॉ. टाले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर विनयभंगासह सरकारी कामात अडथळा अशा प्रकारचे गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून, राजकीय दबावापोटी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया डॉ.टाले यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, दि.१२-०६-२०२३ रोजी घाटबोरी येथील नागरिकांनी फोन करून तक्रार केली होती की, घाटबोरी ता.मेहकर जि.बुलढाणा येथील वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील बर्याच मोठ्या प्रमाणात सागवणाची अवैधपणे कत्तल करून महिला वनरक्षक यांच्या बीटमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रित्या सागवन लाकूड तोडून डेपो तयार करण्यात आला असून, परिसरातील ठेकेदार यांच्या मदतीने सागवन व चंदन तस्करी, वाळू तस्करी रात्रीच्या वेळी करण्यात येते. त्यामुळे काही नागरिकांनी वनमंत्री यांना ई – मेल द्वारे तक्रार केली. व दूरध्वनीवरूनसुद्धा सर्व प्रकार सांगून तक्रार केली. वनमंत्री यांनी तातडीने याची दखल घेत जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक यांना सखोल चौकशीचे आदेश देऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने डीएफओ गजभिये बुलढाणा, एसीएफ लाड मेहकर, यांच्यासह त्यांची टीम घाटबोरी वनपरिक्षेत्र मध्ये दाखल होऊन घाटबोरी वनपरीक्षेत्रामध्ये पाहणी करून चौकशी केली असता संबंधित महिला कर्मचारी दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर त्याचवेळी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश डीएफओ यांनी दिले. याचाच राग मनात धरून व तालुक्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधीला भेटून राजकीय दबावापोटी संबंधित वनअधिकारी महिलेने आपल्यासह सहा सहकार्यांवर खोटे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. व दि.१२ जुन रोजी जानेफळ पोलींसानी तक्रार दाखल करुन घेण्यासाठी नकार दिला होता. नंतर सदर तक्रार सत्ताधारी यांच्या दबावापोटी खोटे गुन्हे दाखल केले, अशा प्रकारची माहिती व प्रतिक्रिया डॉ. टाले यांनी दिली. तसेच यामध्ये जानेफळ पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे व गैरअर्जदार यांची मात्र तक्रार सायंकाळी ७ वाजता पासून दाखल न करता सकाळी ४ वाजता घेऊन चौकशीवर ठेवण्यात येते. हा विलंब कशासाठी, आम्हाला वेगळा न्याय, खोट्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही. पडताळून न पाहताच चळवळीतील नेतृत्व संपवण्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाच्या म्हणण्यावर कार्यवाही झाली. याची सखोल चौकशी वरिष्ठांनी करावी व भ्रष्टाचार उघड केला म्हणून, खोट्या केसेस माझ्यावर दाखल करण्यात आल्या आहेत. अशा कितीही खोट्या तक्रारी, व गुन्हे दाखल झाल्या तरी त्यांची पर्वा करणार नाही. सत्य बाहेर येणारच, मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावेल व मला नक्कीच न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया टाले यांनी दिली आहे. तसेच खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या वेळी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.