आठवण शाळेची, उत्सव मैत्रीचा! तब्बल २२ वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र!!
मेरा बुद्रूक, ता.चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सन २००० ला दहावीत शिक्षण घेतलेल्या ४७ वर्गमित्रांनी २२ वर्षानंतर गेट टुगेदर करत, मेरा बुद्रुक येथील शाळेत दिनांक ११ जून २०२३ रोजी एकत्रीत येत, त्या काळच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर अनेक मित्र आमने सामने येताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले. हा क्षण खरोखरच पाहण्यासारखा व स्मरणात राहण्यासारखा होता.
श्री शिवाजी हायस्कूल मेरा बुद्रुक येथे सन २००० मध्ये वर्ग दहावीत शिक्षण घेतलेल्या मित्रांनी गेट-टुगेदर कार्यक्रम घेऊन तब्बल २२ वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेट-टुगेदर कार्यक्रमाची सुरुवात शाळेची घंटी वाजवून राष्ट्रगीताने झाली, तसेच स्वर्गवासी झालेले शिक्षक तोडे सर, बेंडमाळी सर व सहकारी मित्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रस्तावित सतीश पडघान यांनी केले, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे ४७ वर्ग मित्रांनी आप आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना काही मित्र भाऊक झाल्याचे दिसून आले. एकमेकांचे बदलेले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा याचे निरीक्षण करीत तब्बल २२ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.
मेरा बुद्रुक येथील श्री.शिवाजी हायस्कूल मध्ये २००० ते २००१ या कालावधीत दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, तर कुणी स्वतःच्या व्यवसायात,नोकरीत सक्रिय झाले. त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती. यानंतर काही ठराविक विद्यार्थी कामाला लागून एक – एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एक व्हाट्सअप ग्रुप बनविला .आणि हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. दिनांक ११ जून २०२३ रोजी हा कार्यक्रम श्री.शिवाजी हायस्कूल मेरा बुद्रुक येथे पार पडला.