बिबी (ऋषी दंदाले) – बैलगाडीचे चाक निखळून पडले, गाडीत वयोवृद्ध पेशंट झोपलेला, त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने घरी नेण्यात येत होते. देऊळगाव कोळ ते झोटिंगा रस्त्यावर संबंधित गरीब शेतकरी जाणार्या येणार्यांना मदत मागत होता. परंतु, कुणीही तासभर मदत केली नाही. याच रस्त्याने जाणारे सहकार विद्या मंदीर, बिबी शाळेच्या शिक्षकांना हा प्रकार दिसल्यानंतर ते देवासारखे धावून गेले. निखळलेले बैलगाडीचे चाक गाडी उचलून लावून दिले. गाडीतील रुग्णाला व घामाघूम झालेल्या त्या शेतकर्याला पाणी पाजले. या शिक्षकांच्या या समयसुचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर असे, की येथून जवळच असलेल्या देऊळगाव कोळ (ता.सिंदखेडराजा) ते झोटिंगा या रस्त्याने भरदुपारी दोन शेतकरी आपल्या बैलगाडीने पुढे रस्त्यांना ये जा करणार्यांना मदतीसाठी हात देत होते. पण कोणीच थांबत नव्हते. त्या बैलगाडीत एक वयोवृद्ध झोपलेला होता व उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने ते दोन शेतकरी कासावीस होऊन मदत मागत होते. त्यांच्या बैलगाडीचे एक चाक निखळून पडलेले होते याच रस्त्याने सहकार विद्या मंदिर बिबी शाळेचे शिक्षक हे पालक भेटीसाठी जात होते. शेतकर्यांचे केविलवाणे चेहरे व बैलगाडीत झोपलेले वयोवृद्ध आजोबा व निखळून पडलेले चाक हा सर्व प्रकार शिक्षकांच्या लक्षात आला. त्यांनी त्वरित खाली उतरून चौकशी केली असता, एका तासापासून कोणीही मदतीसाठी थांबले नाही, त्या गाडीत मदत मागणार्या एका इसमाचे वडील झोपलेले असून, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होतो, आमचे घर शेतात आहे. आमच्यासाठी कोणीच थांबले नाही असे सांगत त्यांचा कंठ दाटून आला. तेव्हा शिक्षकांनी त्वरित गाडी उचलून चाक घालून त्यांना मदत केली. त्यांना पाणी पिण्यास दिले. उन्हाच्या दाहकतेत मदतीसाठी कासावीस झालेल्या शेतकर्यांनी ‘देव तुमच्या रुपात मदतीला थांबला’ असे म्हणाले. शाळेच्या शिक्षकांच्या या मदतीला रस्त्यावरील प्रवासी फोटो काढून सर्वत्र कौतुक करीत होते.
—————–