सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषद बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांना सध्या झेडपीमध्ये काम करण्यामध्ये स्वारस्य दिसत नाही. जिथे आपल्याला किंमत नाही तिथे आपण राहत नाही, अशी स्थिती सध्या कुलकर्णी यांची झाली आहे. मागील काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी हे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून ते अस्वस्थ आहेत. त्यासाठी त्यांनी मागील आठवड्यामध्ये मुंबईला बदलीसाठी हेलपाटे मारले आहेत.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अशा मोठ्या कार्यालयामध्ये काम करणारे कुलकर्णी सध्या झेडपीमध्ये रमत नसल्याचे दिसत आहे. बांधकाम विभागामध्ये टॉप लेव्हलला काम करणारे कुलकर्णी यांना झेडपीमध्ये वरिष्ठ अधिकार्यांशी काही केले तरी सूत जुळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी स्वतः हून दुसरीकडे बदली करून घेण्यासाठी धडपड करीत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभाग एक व दोन या दोन विभागाकडे पूर्ण वेळ अधिकारी मिळाले असताना आता पुन्हा बांधकाम दोन चे अधिकारी गेल्यास प्रभारी अधिकार्यावर झेडपीचा कारभार पहावे लागणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणारे कार्यकारी अभियंता कुलकर्णी हे नेमके कोणत्या कारणामुळे नाराज आहेत हे मात्र सध्या अस्पष्ट आहे. परंतु त्यांची खुर्ची अस्थिर असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.