मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – शेतातील शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या तीन भावडांना हे तळे मोठे असल्याने मधातच दम लागला. त्यांचे हातपाय गळाल्याने हे भावंड बुडू लागले. यातील दोन भावंडांना वाचविताना एका भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कोलारा गावात घडली आहे. जीवन रविंद्र सोळंकी (वय १८) असे या मुलाचे नाव असून, या दुर्घटनेने कोलारा गावावर शोककळा पसरली आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील कोलारा येथील जीवन रविंद्र सोळंकी हा आज (दि.९) आपल्या सख्ख्या लहान भाऊ व चुलत भावासह गावातीलच उध्दव पवार यांच्या शेतातील शेततळ्यावर दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोहायला गेला होता. सदर शेततळे हे १० गुंठ्यांमध्ये असल्याने शेततळ्याचे अंतर मोठे होते. या शेततळ्यामध्ये कापड असल्याने जीवनच्या दोनही भावांना पोहोत असतांना दम लागला, व काठावर येण्यासाठी अंतर असल्याने त्यांना काठावर पोहोचण्यासाठी अडचण येऊ लागल्याने सदर जीवनने त्यांच्याजवळ जाऊन त्याने दोन्ही भावांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण शेततळ्यातील कापड हाती धरण्याचा प्रयत्न केला असता कापड हाती न लागल्याने जीवनला दम लागला, तेवढ्यात त्याच्या दोन्ही भावांनी आरडाओरड केली असता शेजारच्या शेतात असलेले रामदास सोळंकी आणि कैलास सोळंकी यांनी शेततळ्याकडे धावत येऊन शेततळ्यात उड्या घेऊन जीवनच्या दोन्ही भावांना वाचविण्यात त्यांना यश आले, पण जीवनला दम लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जीवनाच्या अशा दुर्देवी जाण्याने कोलारा गावावर शोककळा पसरली आहे.