AalandiHead linesMaharashtraPachhim Maharashtra

माऊलींचे पालखी सोहळ्याचे अलंकापुरीतून रविवारी प्रस्थान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरातून माऊलींचे वैभवी पालखी सोहळ्याचे लाखो वारकरी भाविकांचे हरिनाम गजरात उदया रविवारी ( दि, ११ ) सायंकाळी चारच्या सुमारास विधिवत कार्यक्रमानंतर प्रस्थान होणार आहे. यासाठी श्रींचे प्रस्थानचा कार्यक्रम आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी जाहीर केला आहे. ज्ञानेश्वर महाराज मंदिरात रविवारी ( दि.११ ) प्रस्थान दिनी पहाटे पासून पुढे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती, भाविकांच्या महापूजा असे धार्मिक कार्यक्रम परंपरेने होतील. श्रींच्या चल पादूकांवर पुजा, भाविकांना श्रींचे समाधीचे दर्शन होईल. दरम्यान कीर्तन सेवा होईल. त्यानंतर श्रींचा गाभारा स्वच्छता केला जाईल. यात समाधी वर जलाभिषेक, श्रींचा महानैवेद्य होऊन पुन्हा भाविकांना श्रींचे गाभाऱ्यातून दर्शन व्यवस्था खुली राहील.

श्रींचे प्रस्थान सोहळ्या पूर्वी दोनचे सुमारास मंदिरात सोहळ्यातील निमंत्रित दिंड्या प्रवेश हरिनाम गजरात सुरु होईल. यात रथ पुढी आणि मागील अशा ४७ दिंड्यांना मंदिरात प्रत्यके दिंडीतील ७५ भाविकांनाच मंदीरात प्रवेश दिला जाणारआहे. यावर्षी मंदिरातील गर्दी कमी करण्यासाठी तसेच चेंगरा चेंगरी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. सोहळ्याचे प्रस्थानचे उपक्रमात परंपरे प्रमाणे चार च्या सुमारास सुरुवात होईल. यात श्री गुरु हैबतबाबा यांच्या वतीने आणि आळंदी देवस्थान च्या वतीने श्रींची आरती होऊन प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप होईल. वीणा मंडपात व्यापारी तरुण मंडळ आणि माऊली ग्रुप ने फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींच्या पादुकां वेदमंत्र जयघोषात प्राणप्रतिष्ठापणा होईल.
दरम्यान देवस्थान च्या वतीने प्रमुख मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्री गुरु हैबतबाबा यांच्या वतीने देखील दिंडी प्रमुख, प्रतिष्ठीत मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप होईल. दरम्यान परंपरेचे कार्यक्रम झाल्यानंतर आळंदी ग्रामस्थ युवक तरुण माऊली माऊली जयघोषात पालखी खांद्यावर घेऊन प्रस्थान होईल. पालखीचे वीणा मंडपातून प्रस्थान झाल्यानंतर श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा त्यांत महाद्वारातून श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा करीत पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी अर्थात जुन्या गांधी वाड्याचे विकसित दर्शनबारीत समाज आरतीने सोहळा एक दिवसा साठी विसावे. सोमवारी श्रींचे पालखीचा आजोळघरातील पाहुणचार होऊन पुण्यनगरीकडे सोहळा मार्गस्थ होईल.
आळंदीत भाविक नागरिकांची सुरक्षितता जपत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे माध्यमातून आळंदीसाद देहूत देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मध्ये देहू सह आळंदी आणि प्रस्थान मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात झाला आहे. पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त तीन, सहाय्यक आयुक्त आठ, पोलीस निरीक्षक ३९, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक १६०, पोलीस अंमलदार १८२२, क्यू यु आर डी एक, अठरा अंमलदार, सीआरसीएफ, २०० अंमलदार, स्कायडींग १०, १०० अंमलदार तसेच वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त पोलीस उपायुक्त एक, सहाय्यक आयुक्त एक, पोलीस निरीक्षक १२, उपनिरीक्षक १५, पोलीस अमलदार ३३९, वार्डन १५० तसेच बाहेरून मागवलेला पोलीस बंदोबस्त एक पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त चार, पोलीस निरीक्षक १०, उपनिरीक्षक ४५, पोलीस अंमलदार ८००, एसआरसीएफ चार टीम, होमगार्ड ८०० असा मोठा पोलीस बंदोबस्त दोन्ही सोहळ्यासाठी तैनात करण्यात आला आहे. आळंदीत वरिष्ठांचे सूचना प्रमाणे बंदोबस्त तैनात झाला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

भाविकांचे सेवेस आरोग्य सेवा सुसज्ज
माऊलींचे पालखी प्रस्थान सोहळयात आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. आळंदी ग्रामीण रुग्णलाय अधिकांश डॉ. उर्मिला शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांचे नियंत्रणात आरोग्य सेवा सुसज्ज झाली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी आळंदी आणि देहू येथील आरोग्य सेवेच्या कामकाजाची पाहणी करून आळंदी मंदिरासह परिसरातील सेवेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पाहणी दौऱ्यात आळंदी देवस्थान येथील वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, आंतररुग्ण व्यवस्था,आपत्कालीन व्यवस्था यांची पाहणी केली. पुणे जिल्हा परिषद, पुणे आरोग्य विभाग यांचे आरोग्य सेवा पथके, टँकर तपासणी पथके, हॉटेल तपासणी पथके यांची देखील माहिती उपसंचालक यांनी घेतली. आळंदी देवस्थान येथील विश्वस्त समिती समवेत यावेळी समन्वय साधण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, ग्रामीण रुग्णालय आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे, विस्तार अधिकारी सुधाकर म्हाकाळे, ज्ञानेश्वर आढाव, साहेब कुलकर्णी , श्रीम. वैष्णवी देशमाने, श्रीम. कविता उभे आदी कर्मचारी उपस्थित होते.


आळंदी प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ; घरी राहून सोहळा अनुभूती

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी चे वतीने माऊलींचे पालखी प्रस्थान सोहळा २०२३ रविवारी ( दि. ११ ) दुपारी चार वाजल्या पासून प्रस्थानचे थेट प्रक्षेपण खालील लिंक द्वारे भाविक, नागरिकांना पाहण्याची संधी उपलब्द्ध करून देण्यात आली आहे.
फेसबुक लाइव :
https://www.facebook.com/maulialandiweb
यू ट्यूब लाइव :
https://www.youtube.com/@shreesaintdnyaneshwarmahar2004
यावर थेट प्रस्थान सोहळा भाविकांना, नागरिकांना बघता येणार आहे. आळंदीत झालेले सोहळ्याचे नियोजना प्रमाणे तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाविकांचे स्वागतास अलंकापुरी तीळ प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यात आळंदी नगरपरिषद, देवस्थान, पोलीस, महसूल, आरोग्य सेवा, पाणी आणि वीज पुरठा यंत्रांना देखील सज्ज झाली आहे. आळंदी यात्रेवर सीसीटीव्हि ची करडी नजर तैनात असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. यात्रा काळात भाविक, नागरी आणि मंदिर परिसर सुरक्षितता आणि स्वच्छता यास प्राधान्य देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. आळंदी पंचक्रोशीतील वीज यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करून यंत्रणा सुसज्ज करण्यात आली असून अधिकचे कामगार देखील कामावर बोलाविण्यात आले आहेत. वीज पुरवठा खंडीत होणार नाही. याची दक्षता घेतली जात असल्याचे कनिष्ठ अभियंता सुभाष धापसे यांनी सांगितले.
माऊलींचे मंदिरात परंपरेने धार्मिक कार्यक्रम सुरु असून भाविक, नागरिकांची गर्दी होत आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. परिसरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम, कीर्तन,प्रवचन, भजन सेवा सुरु असून आळंदीत भाविकांचे भक्तीला उधाण आलेच सर्वत्र दिसत आहे. इंद्रायणी काठी अनेक ठिकाणी भाविकांनी परंपरेने राहुट्या टाकून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. राज्यातून आळंदीत दाखल होत असलेल्या भाविकांच्या गर्दीने इंद्रायणी नदी घाटासह माऊली मंदिर परिसरातील रस्ते भाविकांचे गर्दीने फुलले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!