बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव या युवकाचे हत्याकांड घडविणार्या आरोपींना जगजाहीर फाशी देऊन त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्या, ही मागणी रेटून धरत वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय आवार दणाणून सोडण्यात आले. सोबतच सर्वसामान्यांच्या हिताच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी होत एकजूट दाखवली. अक्षय भालेरावची जातीय द्वेषभावनेतून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने समाजबांधवांत संताप उसळला आहे. ही घटना महाराष्ट्रातील पुरोगामी संस्कृतीला काळीमा फासणारी असून, संपूर्ण मानवतेला कलंकित करणारी आहे. घटनेचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी उजव्या हाताच्या दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या. या आंदोलनात अर्जुन खरात, बाला राऊत, नानासाहेब जाधव, अनिल पारवे, विजय पवार, किरण पवार, राहुल वानखेडे, समाधान डोंगरे, डॉ. राहूल दाभाडे, संतोष कदम, नीलेश जाधव, सतीश गुरचवळे, संदीप गवई, वसंता वानखेडे, समाधान पवार, अनिल पवार, गौतम गवई, अमर गवई, अॅड. सुरडकर, अॅड. अमर इंगळे, अॅड. वानखेडे, मेजर खिल्लारे, मेजर रमेश जाधव, गजानन गवई, सुरेश जाधव, शेख यासीन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.
तर महाराष्ट्रात अराजकता माजेल : पवार
अक्षयच्या मारेकर्यांना फाशी देऊन त्याला न्याय द्यावा, अॅट्रॉसिटी किंवा त्याच्या समकक्ष कायदे अधिक कठोर करावेत, त्याच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसाह्य द्यावे, भविष्यात त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत, ही खबरदारी म्हणून कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे सतीश पवार यावेळी म्हणाले. गांभीर्याने दखल न घेतल्यास पुरोगामी महाराष्ट्रात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
—————