बुलढाणा/सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाणी पुरवठा करून लोकांची तहान भागविणार्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. शासकीय कामानिमित्त येणार्या ग्रामस्थांना या कार्यालयात साधे पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांबद्दल संताप व्यक्त होत आहे. येथील पाणी असुविधेचा स्वतः ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ टीमने अनुभव घेतला.
ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभाग बुलढाणा यांच्यामार्फत राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विविध गावांमध्ये नवीन विहीर पाईपलाईनचे काम मोठ्या जोमात सुरू आहे. काही ठिकाणी ठेकेदाराने ही कामे तातडीने गुंडाळण्याचे धोरण अवलंबविल्याचे दिसते, व याकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा विभाग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे काम करतो. परंतु दिनांक २९ मेरोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागात ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ची टीम गेली असता, या कार्यालयात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. येथील अधिकारी साधी दहा रुपयांची जारची बाटलीसुद्धा आणू शकत नाही? विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या संपूर्ण पाणी पुरवठा विभागात कुठेही ग्रामस्थांसाठी पिण्याचे पाणी मिळत नव्हते.
काही सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये कामानिमित्त गेले असता, उन्हाची दाहकता लक्षात घेता, त्यांना तहान लागली असता, एका कार्यकर्त्याने, एका कर्मचार्याला विचारले, ‘साहेब पिण्याचे पाणी आहे का’? त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘पिण्याचे पाणी कार्यालयात कुठे सापडणार नाही’? या कार्यालयात तर गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी स्वतःसाठी पिण्याचे पाणी आणू शकत नाही, याबद्दल ग्रामस्थांत संताप व्यक्त होत होता. हा पाणीपुरवठा विभाग ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याचे काम करतो. परंतु कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्यामुळे कामानिमित्त येणारे ग्रामस्थ मात्र तहानलेले राहतात, अशी दुर्देवी परिस्थिती आहे.
—————–