बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील शासकीय कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना शासनाने मुदतवाढ दिली असून, आता येत्या ३० जूनपर्यंत शासकीय कर्मचार्यांच्या बदल्या करता येणार आहेत.
राज्यातील शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाड़त असताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येकवर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. तथापि, सन २०२३-२०२४ या चालू वर्षातील ३१ मेपर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या आता ३० जून २०२३ पर्यंत करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी विद्या भोईटे यांनी ३० मे रोजी जारी केला आहे.
मागील वर्षी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या नाहीत , यामुळे राज्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना बदल्यापासून वंचित रहावे लागले होते . गेल्या वर्षी सर्वसाधारण बदल्यास राज्य शासनांकडून वारंवार मुदतवाढ देण्यात येत होती. अखेर सन 2022-23 मधील सर्वसाधारण बदल्या रद्दच करण्यात आलेल्या होत्या. या वर्षी देखील सन 2023-24 मधील चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
दरम्यान, राज्यातील पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे मंगळवारी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात १९ पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक तानाजी वांदे यांची कोल्हापूर शहर, पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र, निलंगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांची सिल्लोड, शिंर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांची अहमदनगर, जालनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांची मंगळवेढा येथे बदली झाली आहे. तर बदलीच्या प्रतिक्षेत असलेले संदीप मिटके यांची शिर्डी, अश्विनी शेंडगे यांची दहिवडी, अकलुजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांची श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगरचे अप्पर-उपायुक्त नितिन कटेकर यांची निलंगा, मंगळवेढाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांची पांढरकवडा, रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांची अक्कलकुवा, नागपूर पोलीस शिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य शोभा पिसे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.