Breaking newsBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

समृद्धी महामार्गावर देऊळगावपोळनजीक भीषण अपघात; तीन ठार

– महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; आतापर्यंत ३९ जणांचे गेले बळी, १४३ झाले जायबंदी!

लोणार (तालुका प्रतिनिधी) – समृद्धी महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळाच बनला असून, या महामार्गावर दररोज जीवघेणे अपघात सुरू आहेत. या महामार्गावर आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ गाडी सिमेंटच्या रेलींगला धडकून झालेल्या भीषण अपघातात गाडीने पेट घेतला, व त्यात दोन प्रवासी जळून जागीच ठार झाले तर एक प्रवासी उपचारादरम्यान दगावला आहे. हा प्रवासी गाडीच्या बाहेर फेकला गेला होता परंतु, दुसरबीड येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याने दम तोडला. लोणार तालुक्यातील बिबी पोलिस ठाणेहद्दीत देऊळगाव पोळ नजीकच्या चेनेज ३०५ वर हा अपघात घडला. भरधाव स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक एमएच ०२ सीआर १४५९) ही नागपूरहून शिर्डीकडे जात होती. मृतदेह जळालेले असल्याने ओळख पटवणे अवघड झाले होते.

बिबी पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले, की समृद्धी महामार्गावरील देऊळगाव पोळनजीक एक भरधाव स्कॉर्पिओ गाडी सिमेंट रेलिंगच्या डिव्हायडरला धडकली. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या गाडीमध्ये डिझलचे डब्बे होते. अपघातानंतर गाडीने  पेट घेतला.  गाडीमध्ये तीन प्रवासी होते, त्यापैकी एक जण बाहेर फेकला गेला तर दोघे होरपळून ठार झाले. तिसर्‍या जखमीला तातडीने दुसरबीड व नंतर मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले असता, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.  अपघात इतका भीषण होता की समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडोरवरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. या घटनेतील मृतदेह मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास महामार्ग पोलिस करत आहेत.


स्कॉर्पिओ गाडीमध्ये होते डिझेलचे डब्बे, त्यामुळे भडकली आग!

पोलिसांच्या माहितीनुसार, या स्कॉर्पिओ गाडीमध्ये डिझेलने भरलेल्या पाच ते सहा कॅन होत्या. गाडीने पेट घेताच या डिझेलचा भडका उडाला. त्यात दोघांचा जागीच होरपळून कोळसा झाला. तिसरा प्रवासी बाहेर फेकल्याने बचावला तरी, त्याच्यावर प्रारंभी दुसरबीड व नंतर मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असताना तोही मृत्युमुखी पडला. पहाचे साडेपाच वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीने पेट घेतल्याची माहिती कळताच महामार्ग पोलिस एपीआय अरुण बकाल, पीएसआय राजू गायकी यांच्यासह त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थली धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. परंतु, आग भीषण असल्याने त्यांना गाडीमध्ये अडकलेल्यांचा बचाव करता आला नाही. बाहेर फेकला गेलेला प्रवासी अजय दिनेश भिलाल (मध्यप्रदेश) याला रुग्णवाहिकेने प्रारंभी दुसरबीड व नंतर मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरूळीत करण्यात आली होती.  विदर्भातून जाणारा समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून, डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत ३९ जणांचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाला आहे, तर १४३ जण जायबंदी व असंख्य गंभीर जखमी झालेले आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!