ChikhaliHead linesVidharbha

सावकारीच्या नावाखाली मागासवर्गीय शेतकर्‍याची जमीन हडपण्याचा शिक्षकाचा प्रयत्न?

– न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा

चिखली ग्रामीण (प्रतिनिधी) – शासनाकडून मिळालेल्या घरकुल बांधकामासाठी एका शिक्षकाने जमिनीच्या मोबदल्यात व्याजाने पैसे देवून एका शेतकर्‍यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार आमखेड येथील शेतकरी भीमराव गवई यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दि. २३ मे रोजी केली आहे. धक्कादायक बाब अशी, की या तक्रारीत चिखली पाेलिस ठाण्यातील दाेन पाेलिसांवर गंभीर आऱाेप करण्यात आलेले आहेत. त्यावर कर्तव्यदक्ष पाेलिस अधीक्षक सुनील कडासने काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

चिखली तालुक्यातील आमखेड येथील रहिवासी भीमराव कचरू गवई यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे, की शासनाकडून आम्हाला घरकुल मिळाले, मात्र शासनाच्या पैसात घरकूल बांधकाम होणार नाही, म्हणून गावातील व्याजाने पैसे देण्याचा धंदा करणारे शिक्षक रमेश माळी यांना स्वत:च्या मालकीची आमखेड शिवारात गट नं ५० मध्ये ०.४१ आर असलेली जमीन दीड लाख रुपयांत गहान दिली, आणि त्यांच्याकडून ६० हजार रुपये तसेच सिमेंट व लोखंड घेवून काही पैसे घेणे बाकी होते. मात्र या शिक्षकाने राहिलेले पैसे न देता त्यांनी गुंडप्रवृत्तीचे त्यांचे साथीदार सुनिल जयदेव वाघ, सीमाबर जयदेव वाघ, नीलेश जयदेव वाघ, आकाश किसन वाघ यांना घेवून शेतातील जबरदस्तीने भाजीपाला उपटून नुकसान केले. तसेच काळे पाईप व नोझल घेवून गेले. असे का करता म्हणून हटकले असता त्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी चिखली पोलिस ठाण्याचे राजू सुसर व कडूबा मुंडे या दोन पोलीस कॉस्टेबल कर्मचार्‍यांना बोलावून घेतले आणि दिवसभर पोस्टेला बसून मारहाण केली, आणि संध्याकाळी सोडून दिले आणि धमकी दिली की तू कोणाकडेही गेला तरी आमचे काहीही होणार नाही. त्यामुळे जमीन सोडून दे नाहीतर तुझ्या जिवाचे व कुटुंबाचे बरेवाईट करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी दिली. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ दखल घेवून आमची जमीन सावकराच्या जाळ्यातून काढावी, व मारहाण करणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी तसेच तक्रार भीमराव गवई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे २३ मे रोजी दाखल करून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.


विशेष बाब म्हणजे, सरकारी नोकर अथवा शिक्षक असल्याने संबंधिताला अवैध सावकारी करता येते का, हादेखील प्रश्न असून, या शिक्षकाची सहकार उपनिबंधक यांनीदेखील चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने हे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. एका मागासवर्गीय व गरीब शेतकर्‍यावर जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर ते हा अन्याय सहन करणार नाहीत, अशी जिल्हावासीयांना खात्री आहे. शिवाय, संबंधित मागासवर्गीय शेतकर्‍याला चिखली पोलिस ठाण्यात विनाकारण बसवून ठेवून मारहाण झाली असेल तर तीदेखील अतिशय गंभीर बाब असून, या शेतकर्‍याला खरेच चिखली पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते का, त्याला विनाकारण बसविण्यात आले होते, का हे तेथील सीसीटीव्ही तपासून दिसून येईलच. त्यामुळे या गरीब व मागासवर्गीय शेतकर्‍याला न्याय मिळणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी बोलताना व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!