विक्रमगड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – ज्यांनी गुण संपादन केले, त्यांचे अभिनंदन, पण भविष्यात विविध आव्हानांना ध्यैर्याने सामोरे जा, असे मार्गदर्शन विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार यांनी केले. श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युलताताई पंडीत यांच्या ७०व्या जन्मदिनाचे औचित्य साधून १०वी १२वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ विक्रमगड येथे दिवेकरवाडी सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी तहसीलदार बोलत होत्या.
विद्यार्थ्यांच्या या गुणगौरव कार्यक्रमास मुख्य अतिथी तहसीलदार पवार उपस्थित होत्या. तर महिला व बाल विकास अधिकारी बापू शृंगारे, पोलिस निरीक्षक गीते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन येणार्या आव्हानांना ध्यैर्याने, संयमाने सामना करावा, असे मार्गदर्शन केले. तसेच १०वी १२वी नंतरच्या विविध शैक्षणिक संधी, याबाबत माहिती दिली. कौशल्य शिक्षणाचे महत्व पटवून देऊन मर्यादित शासकीय नोकर्यांमुळे कौशल्य शिक्षणामुळे जास्तीत जास्त स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतात, हे पटवून देऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षणाकडे नवीन संधी म्हणून बघावे, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजक विक्रमगड श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते लवेश कासट, शंकर भोये, मेहुल पटेल. पौर्णिमाताई पवार, सविताताई कासट व इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थी व मान्यवरांचे आभार मानले.
Leave a Reply