Breaking newsCrimeHead linesMaharashtraVidharbha

पाेलिसांनीच कायदा हातात घेतला; युवकांना अमानुष मारहाण!

– म्हणे, गोळी घालून मारू, आणि नक्षलवादी होते म्हणून सांगू!

गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी) – पोलिसी अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अहेरी पोलिसांनी मानवाधिकाराचे उल्लंघन करत एका युवकास अमानुष मारहाण केली आहे. एवढेच नाही तर बंदुक डोक्याला लावत, तुला गोळी घालून मारू व नक्षलवादी होता म्हणून सांगू, अशी जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. वरिष्ठांकडे तक्रार केली तर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही देण्यात आल्याची लेखी तक्रार पीडित तरुणाने अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, अहेरी (जि. गडचिरोली) यांच्याकडे केली असून, या अमानुष मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरण असल्याचेही या तक्रारीत नमूद आहे. मारहाण करणारे दोन पोलिस शिपाई हे मद्यधुंद होते, असेही या तक्रारीत नमूद आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली असून, राज्य मानवाधिकार आयोग या घटनेची दखल घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
सविस्तर असे, की अहेरी तालुक्यातील अहेरी- कन्नेपल्ली मार्गावर दिनांक ५ जुलैच्या रात्री १२.३० वाजता हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत जीवन प्रकाश मंत्रीवार या युवकाने दिलेल्या तक्रारअर्जानुसार, रोहन अनिल शुध्दलवार, रा. अहेरी हा तरुण कन्नेपल्ली येथील शेतीकामावर गेला होता. तो कामावरून परत येत असताना, मौजा अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनीमधील साई मंदिराजवळ दोन पोलिस शिपाई घनश्याम तोडासे व माळप्पा बन्सोडे हे रात्रीच्या गस्तीवर होते. या दोघांनी सदर युवकास अडवुन कुठे जावून येत आहे, असे विचारले असता त्याने सांगितले की, मी कन्नेपल्लीला शेतीकामाकरीता जावून येत आहे आणि आता मी माझा मित्र जीवन मंत्रीवार यांच्या घरी जात आहे. युवकावर शंका आल्याने पोलीस शिपाई यांनी जीवन मंत्रीवार याला मोक्यावर बोलवायला सांगितले. तेव्हा रोहन आपला मित्र जीवन मंत्रीवारला फोन करून बोलविले असता, जीवन हा साई मंदीर येथे काही वेळात पोहोचला. त्याने स्वतःचा परिचय देऊन रोहन शुध्दलवार हा माझा मित्र असून हा माझ्याच घरी येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आम्ही जायचे का? म्हणून विचारले असता, पोलीस शिपाई हे दारुच्या बेधुंद नशेत असल्याने, तुला एवढी घाई कशाची आहे? म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर जीवन यांनी शिवीगाळ कशाला करून राहिले साहेब? असे उत्तर दिल्यावर जीवनला मारहाण करण्यासाठी पोलिस जवळ आले. तेवढ्यात जीवन घाबरून किष्टापूर रस्त्याकडे पळाला. परंतु पोलीस शिपाईने त्यांच्या दुचाकीने दोन्ही युवकांचा मागे येऊन किष्टापूर फाट्याजवळ पकडून त्यांना लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. जीवन यांनी पोलीसांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत असतांना, पोलीस शिपाई बन्सोडे यांनी त्यांच्याजवळील पिस्टल काढून जीवनच्या डोक्यावर लावली आणि तुला मारून नक्षलवादी म्हणून ठरवणार अशी धमकी दिली. पोलीसांनी युवकाला मारहाण केल्यानंतर पोलीस शिपाई घनश्याम तोडासे व माळप्पा बन्सोडे यांनी पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांना किष्टापूर मार्गावर बोलाविले.
पोलिस निरीक्षक गव्हाणे हे आपल्या खाजगी कार क्र- MH40-CA-2400 ने मौक्यावर येऊन सदर युवकाच्या गालावर ३-४ थापड मारले. त्यानंतर युवकाने गव्हाणे यांना विनंती करून माझ्या वडिलांना फोन करून बोलविण्यास सांगितले. तेव्हा गव्हाणे यांनी जीवनच्या वडिलांना फोन करून साई मंदीराजवळ बोलाविले. तेव्हा जीवनचे वडिल म्हणाले की, माझ्या मुलाची काहीही चूक नसताना मारहाण केल्यामुळे मी तुमच्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देतो. तेव्हा गव्हाणे यांनी तुम्ही तक्रार दिले तर आम्ही तुमच्या मुलावर कलम ३५३ व ३०७ नुसार गुन्हा दाखल करणार म्हणून धमकी दिली. हा सर्व प्रकार घडल्याचे सदर युवकाने अपर पोलीस अधीक्षक, अहेरी व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना लेखी अर्जातून सांगितले आहे. लोकांचे रक्षण करणारेच कायद्याचे उल्लंघन करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असतील, तर सर्वसामान्य लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा? असा सूर जनतेतून निघत आहे. या प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घ्यावी, व कायदा हातात घेणार्‍या पोलिसांवर गुन्हे दाखल करून, त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!