बुलडाणा ( राजेंद्र काळे ) शंकरबाबांंची मानसकन्या दिपाली तथा बुलडाणा येथील जांगीड परिवारातील आशिष या मुकबधिर दांम्पत्याचा विवाह सोहळा, बुलडाणा येथील सहकार सांस्कृतिक भवनाच्या सभागृहात मंगळवार ५ जुलै रोजी राष्ट्रीय महोत्सव म्हणून पार पडला. तामिळी सह महाराष्ट्रीयन व राजस्थानी पध्दतीने झालेल्या या लग्नात जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती व सौ.राजेश्वरी रामामुर्ती यांनी कन्यादान केले, तर मुलीच्या पाठीमागे मामा म्हणून उभे राहिले ते जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया. विभागीय आयुक्त परनीत कौर यांनी सहाय्यक आयुक्त शामकांत म्हस्के यांना खास ‘अहेर’ घेऊन पाठवले होते. बुलडाणा अर्बनच्या तोरणदारी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या संकल्पनेतून तथा डॉ.सुकेश झवर व सौ.कोमलताई झवर यांच्या नियोजनातून पार पडलेल्या या सोहळ्यात, बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी १८ वर्षावरील विकलांग व दिव्यांग मुला-मुलींच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व शंकरबाबा पापळकर या दोघांची भेट घडवून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दिपाली, स्व.अंबादास पंत बालगृह चालविणाऱ्या शंकरबाबांना वयाच्या ३ ऱ्या वर्षी भेटली कुंभमेळ्यात. ती २१ वर्षाची होताच बाबांनी तिच्यासाठी नवरदेव बघणे सुरु केले, त्यांनी माहिती व फोटो राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजींना पाठवला. बुलडाणा अर्बनमधील कर्मचारी प्रिती कोलारकर मॅडम यांच्या शेजारी बिहारीलाल जांगीड यांचा मुलगा आशिष हा मुकबधिर असल्याने ते स्थळ प्रिती मॅडमनी सुचवले. बघण्याचा कार्यक्रम झाला, दोघे एकमेकांना आवडले अन् विवाह ठरला. या विवाहाची संपूर्ण जबाबदारी उचलली ती, बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून भाईजींनी. डॉ.सुकेश व कोमलताई झवर नियोजनासाठी पुढे आले. हर्षवर्धन सपकाळ व पत्रकार राजेंद्र काळे आयोजनातील घटक बनले. अनंताभाऊ देशपांडे यांनी मंगलाष्टके तयार केली. रविवार ३ जुलैला साक्षगंध अन् मेहंदी झाली, सोमवार ४ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवास स्थानी हळदीचा कार्यक्रम तामिळी पध्दतीने झाला, संगीत रजनीत नृत्य व अन्य सांस्कृतिक अविष्कार पार पडले. मंगळवार ५ जुलै रोजी बँड-बाजा-बारात अशा पध्दतीने नवरदेवाची धुमधडाक्यात घोड्यावरुन वरात निघाली. नवरी नटून-थटून तयार झाली, अन् मग सुरु झाला आगळा-वेगळा वैवाहिक राष्ट्रीय महोत्सव.
सुरुवातीला भाईजींनी या विवाह सोहळ्यामागची पृष्ठभूमी प्रास्ताविकातून विषद केली. ज्यांच्यावर निसर्ग अन्याय करतो, त्याला न्याय देण्यासाठी देवदुताच्या रुपाने कोणीतरी पुढे येत असतो.. तीच भावना या विवाह सोहळ्यात असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांनी भारतातील प्रत्येक घटक समान असल्याचे कायदा सांगत असल्याचे सांगून, त्यादृष्टीने हा विवाह राष्ट्रीय महोत्सव असल्याचे ते म्हणाले.
आ.संजय गायकवाड यांनी शंकरबाबा पापळकर, नंदकुमार पालवे व दिव्यसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा गौरव करुन, विकलांग तथा दिव्यांग घटकांना १८ वर्षानंतर जी ससेहोलपट सोसावी लागते त्यावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी ज्या आनंद दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना अनाथांचा नाथ होण्याची शिकवण दिली, त्याच माध्यमातून मुख्यमंत्री व शंकरबाबांची भेट यासाठी आपण लवकरच घडवून आणणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी या विवाह सोहळ्याचे महत्व सांगून मुलीचे मामा म्हणून जो मान भेटला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तंबाखूविरोधी शपथ सौ. अर्चना आराख यांनी दिली. यावेळी प्रशासकीय व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी तथा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले.