LONARMEHAKARVidharbha

‘व्हीजे-अ’ जातप्रवर्गाचे आरक्षण धोक्यात!

– बिबी येथे समाजाच्या महत्वपूर्ण बैठकीत लढा देण्याचा निर्धार!

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – बंजारा समाजासह व्हीजे-अ प्रवर्गातील जातींचे आरक्षण बोगस जातप्रमाणपत्रे व तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेल्या जीआरमुळे धोक्यात आले असून, या समाजाच्या आरक्षणाला नख लावले जात आहे. त्यामुळे सामाजिक प्रगती खुंटत चालली असून, समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. याप्रश्नी संवैधानिक मार्गाने लढा देण्याचा निर्धार बिबी येथे पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे.

लोणार तालुक्यातील बिबी येथे बंजारा समाजाच्यावतीने विमुक्त जाती (व्हीजे-अ) प्रवर्गाच्या आरक्षण समितीची बैठक दिनांक १५ मेरोजी सकाळी साडेदहा वाजता वसंतराव नाईक विद्यालय येथे समाज बांधवांसह माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. व्हीजे-अ प्रवर्ग सततचे होत असलेल्या आरक्षणाच्या हेळसांडीसह अलीकडच्या काळात बोगस प्रमाणपत्राचे प्रमाण खूप वाढल्याने, विशेष करून बुलढाणा जिल्ह्यात वाढल्याने व्हीजे-अ प्रवर्गातील १४ जातींमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः सप्टेंबर २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे या घुसखोरीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे हा जीआर तातडीने मागे घेण्यात यावा, अशी तीव्र भावना विविध समाज घटकांमधून या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

मुळातच तुटपुंजी असलेले हे आरक्षण बोगस घुसखोरीमुळे संपुष्टात येऊन या व्हीजे-अ प्रवर्गातील नागरिकांची प्रगती संपुष्टात येत आहे. तसेच, आणखीनच आर्थिक मागासलेपण त्यांच्या वाटेला येईल. याकरिता संपूर्ण राज्यभर संघटितपणे याचा प्रतिकार संविधानिक मार्गाने करण्यात यावा, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला माजी समाज कल्याण सभापती अभय चव्हाण तसेच परशुराम राठोड, प्रशांत राठोड, बाबूसिंग जाधव, जगतसिंग राठोड, एचडी राठोड सर, राठोड सर बीसी, जंगलसिंह राठोड चव्हाण, किसन राठोड यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!