BULDHANAHead linesKhamgaonVidharbha

खामगाव बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीची मंगळवारी निवड़!

– पेसोड़े, पाटेखेड़े, चिंचोळकार, टिकार सभापती पदासाठी चर्चेत, उपसभापतीपद राष्ट्रवादीला की वंचित आघाडीला?

खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – वार्षिक अड़ीच हजार कोटींच्यावर उलाढाल असलेली व विदर्भात पहिल्या क्रमांकावर असलेल्या खामगाव बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवड़ीकड़े सर्वांच्या नजरा लागल्या असून, येत्या मंगळवारी म्हणजे १६ मेरोजी सदर पदासाठीच्या निवड़ी होणार आहेत. सभापती पदासाठी सुभाष पेसोड़े, शांताराम पाटेखेड़े, प्रमोद चिंचोळकर, श्रीकृष्ण टिकार आदींची नावे चर्चेत आहेत. तर उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला की वंचित बहुजन आघाडीला मिळते, याकड़ेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, यामध्ये किंगमेकर म्हणून माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून, त्याबाबत नावांचा सस्पेन्स सद्यातरी कायम आहे.

जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील क्रमांक एकची बाजार समिती म्हणून खामगाव बाजार समितीकड़े पाहिले जाते. या बाजार समितीत बुलढाणासह वाशिम, अकोला, औरंगाबाद, जालना, जळगाव खान्देश जिल्ह्यातूनही शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. वार्षिक अड़ीच हजार कोटीच्यावर उलाढाल असलेल्या या बाजार समितीची निवड़णूक २८ एप्रिलला पार पड़ली. माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी तसेच भाजप व शिवसेना शिंदे गट युती, अर्थात आ. अ‍ॅड़. आकाश फुंड़कर यांच्यात जोरदार लढत झाली. या निवड़णुकीत महाविकास आघाडी व वंचितला पंधरा जागा मिळाल्या. तर आ. अ‍ॅड़. आकाश फुंड़कर यांनी मोठी प्रचार यंत्रणा राबवूनही तीन जागांवर युतीचा रथ थांबला.

विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचा किल्ला माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी एकट्याने लढविला. यामध्ये काँग्रेसला दहा, राष्ट्रवादी काँग्रेस तीन तर बहुजन वंचित आघाडीला दोन जागा मिळाल्या. सदर बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी१६ मेरोजी निवड़णूक होत आहे. सभापती पदासाठी सुभाष पेसोड़े, शांताराम पाटेखेड़े, प्रमोद चिंचोळकार, श्रीकृष्ण टिकार आदिंची नावे चर्चेत आहेत. असे असले तरी माजी आ.दिलीपकुमार सानंदा हे ठरवतील, त्याचेच नाव यासाठी फायनल होणार आहे. सदर निवड़णुकीत राष्ट्रवादीला तीन तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे उपसभापती कोण, यावर खल होणार असून, राष्ट्रवादीकड़े हे पद गेल्यास गणेश माने, कोकरे यापैकी एकाला संधी मिळू शकते तर वंचितकड़े गेल्यास संघपाल जाधव यांची लॉटरी लागू शकते. तर नाट्यमय घड़ामोड़ीत दोन्ही पदे काँग्रेसकडे राहतात का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.


याबाबतचा सर्वमान्य निर्णय वाटाघाटीतून निघण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, येथे सद्या तरी कोणतीही स्पर्धा दिसत नसून, माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सदर निवड़णूक आगामी विधानसभा निवड़णुकीची लिटमस टेस्ट असल्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, सभापती व उपसभापती निवड़ीबाबतच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!