Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

पांडुरंगामुळे मुख्यमंत्री झालो, तर संत चोखोबारायांमुळे सत्तेत तरलो!

– संत शिरोमणी चोखोबारायांच्या मंदिराचे थाटात लोकार्पण
– राज्यात संत विद्यापीठ स्थापन्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

इसरूळ/चिखली (सुनील मोरे) – पांडुरंगाचे आशीर्वाद मिळाले आणि मी या राज्याचा मुख्यमंत्री झालो. आता संत चोखोबारायांचे आशीर्वाद मिळाले आणि कालच्या न्यायालयीन संकटात तरलो, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार तरण्याचे संपूर्ण श्रेय चोखोबारायांच्या आशीर्वादाला दिले. संत परंपरेतील महान संतांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळ्याला उपस्थित राहता आले, हा भाग्याचा क्षण आहे. या मंदिरासाठी काहीही कमी पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. इसरूळ येथील एकमेव अशा संत चोखोबारायांच्या मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्याहस्ते हजारो जनसमुदयाच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, नारायण कुचे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, गोपीकिसन बाजोरिया, हरिभाऊ बागडे, कार्यक्रमाचे आयोजक हभप. पुरूषोत्तम महाराज पाटील, विजय जगताप, हभप. पाटणकर महाराज, इसरूळचे सरपंच सतिश भुतेकर पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याला संत आणि वारकरी परंपरेचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. या गौरवशाली परंपरेचा मान राखण्यासाठी व संतांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात संत विद्यापीठाची स्थापना करण्याची महत्वपूर्ण घोषणादेखील मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केली. संत साहित्याचा अभ्यास आणि चिकित्सा होणे काळाची गरज आहे. अभंग, भारूडाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत विद्यापीठ उपयुक्त ठरेल, असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. संत परंपरा भक्ती, सहनशक्ती, संयम, विवेक आदी गुणांची प्रेरणा देते. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन तसेच लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. आध्यात्मिक परंपरेचे स्थान राजकीय व इतर क्षेत्राहून वरचे आहे. हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचेही वारकरी संप्रदायावर खूप प्रेम होते, असे सांगून, परमेश्वराच्या भक्तीतून देवत्वाकडे जाणारी वारकरी परंपरा महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे. कीर्तनकार, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील वारकरी परंपरेला मोलाचे स्थान दिले होते, असेही मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले. कीर्तन सेवेतून मिळालेल्या मानधनातून घरावर पत्रे न टाकता, संत चोखोबारायांचे मंदीर उभे करणारे हभप. पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरव केला, तसेच या मंदिरासाठी काहीही कमी पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.


दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता. परंतु, मुंबईत झालेला विमान बिघाड, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे झालेला हेलिकॉप्टर बिघाड या अडथळ्यांवर मात करून दुपारी अडिच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे इसरूळ येथे हेलिकॉप्टरने पोहोचले. मुख्यमंत्री इसरूळ येथे येणार असल्याने अनेक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेेदेखील कार्यक्रमस्थळी आले होते. पीकविम्याची नुकसान भरपाई, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई याप्रश्नी ते मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याची शक्यता पाहाता, पोलिसांनी वेळीच चोख नियोजन करत मुख्यमंत्र्यांभोवती बंदोबस्त वाढविला. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेऊन त्यांना शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत डिटेन करून ठेवले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईबद्दल शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आम्ही काय दहशतवादी आहोत का, अशा शब्दांत विनायक सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचा धिक्कार केला.
———

इसरूळला येताना मुख्यमंत्र्यांना आल्या अडचणीच अडचणी! – breakingmaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!