Breaking newsBULDHANAHead lines

वाढदिवसाचा नो इव्हेंट..नो तामझाम; ओन्ली काम!

शेतकर्‍यांचे लढवय्ये नेते, पंचप्राण, आणि बुलढाणा जिल्ह्याचे भावी खासदार रविकांतभाऊ तुपकर यांचा १३ मे हा वाढदिवस. परंतु, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते असल्याने ते वाढदिवस साजरा करत नसतात. तरीही शेतकर्‍यांसाठी वेळप्रसंगी अंगावर लाठ्याकाठ्या झेलून, जेलमध्ये जाऊन, नानाविध यातना सोसत, त्यांनी जे काम केले आहे, ते अतुलनीय आहे. बळीराजाच्या या लोकराजाला वाढदिवसानिमित्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ परिवाराच्यावतीने अनंत शुभेच्छा देत आहोत. त्यांच्या कार्याचा यानिमित्ताने घेतलेला आढावा…


रविकांत तुपकर हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेलं शेतकरी चळवळीतील नाव आहे. महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ, युवकांचे आयकॉन, शेतकरी नेते, आंदोलन सम्राट, शेतकर्‍यांसाठी लाल दिव्याला अर्थात सत्तेच्या पदाला लाथ मारणारा खरा शेतकरी लढवय्या यांसह अनेक उपाध्या या नेतृत्वाला दिल्या जातात. विदर्भातील सोयाबीन – कापूस उत्पादकांचा बुलंद आवाज म्हणून रविकांत तुपकर या शेतकरी योद्ध्याची ओळख आहे. शेतकर्‍यांचा हा नेता असला तरी वागणे मात्र कायम सामन्य कार्यकर्त्यासारखे आहे. अलीकडे वाढदिवस साजरा करण्याचं जणू फॅडच आलं आहे. अनेक नेते स्वतःच्याच पैश्याने कार्यकर्त्यांचे फोटो घालून बॅनर-पोस्टर लावतात. परंतु रविकांत तुपकर त्याला अपवाद आहेत. नो इव्हेंट… नो तामझाम… नो फ्लेक्सबाजी… ओन्ली काम ही तुपकरांची पद्धत आहे. त्यामुळे वाढदिवस देखील ते साजरा करत नाही, हे विशेष..! वाढदिवसाचा दिवसही तुपकरांचा कामातंच जातो, त्यादिवशी ते दिवसभर ऑफिसला असतात लोकांची कामे करतात, आलेल्या लोकांना भेटतात, त्यांच्या भावनांचा आदर राखत फक्त त्यांच्या शुभेच्छा स्विकारतात.

रविकांत चंद्रदास तुपकर हा शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला नेता. बुलडाण्यापासून जवळच डोंगरकाठावर वसलेले सावळा हे त्यांचे गाव. कुटुंबातील कुणालाच राजकारणाचा वारसा नाही. आई-वडील हाडाचे शेतकरी. तुपकरांचे प्राथमिक शिक्षण बुलडाणा तालुक्यातील दहिद बुद्रूक येथे मामाच्या गावी झाले. त्यानंतर १२ वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी भारत विद्यालयात घेतले. सावळा ते बुलडाणा असा दररोज ८ ते १० किलोमीटरचा सायकलप्रवास करून ते बारावी सायन्समध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर कला शाखेतून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा शेती हा परंपरागत व्यवसाय होता, शिवाय त्याला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायदेखील होता. रविकांत तुपकर यांनी देखील दररोज सकाळी बुलडाणा शहरात घरोघरी दूध वाटपाचे काम केले. शालेय जीवनातच शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शेतकरी चळवळीत उडी घेतली आणि गेल्या २० वर्षांपासून हा अवलीया शेतकरी चळवळीत इमानेइतबारे जीवाची बाजी लाऊन लढतो आहे.

आजकाल लग्न, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि एवढेच काय तर घरातील मयताचा विषयही ईव्हेंट म्हणून राबविला जातो. पोस्टरबाजी, तामझाम, पैशांची उधळपटी होताना सर्वत्र दिसून येते. परंतु रविकांत तुपकर यांनी आयुष्यातील कोणत्याच घटनेचा इव्हेंट केला नाही. एका तत्वाने भारावलेल्या या माणसाने लग्नदेखील अगदी साध्या पद्धतीने केले होते. भगतसिंह यांच्या फोटोला हार घालून रविकांत तुपकर व अ‍ॅड. शर्वरी तुपकर विवाहबद्ध झाले होते. ३ नोव्हेंबर रोजी तुपकरांना कन्यारत्न प्राप्त झाले. मुलगी यज्ञजा हीचा जन्म झाला तेव्हा तुपकर पंढरपूर ते बारामती पदयात्रेत होते. ही यात्रा संपवून दीड महिन्यांनी ते घरी परतले, तेव्हा त्यांना आपल्या मुलीला पाहता आले. तर २३ मे २०१७ रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, तेव्हा हा अवलीया माणूस पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत होता. मुलाचे नाव ठेवायचा समारंभ आज करु, उद्या करु असे ठरवत अखेर वर्षभराने देवव्रत हे नाव ठेवण्यात आले, आणि ते देखील एका जाहीर सभेत. शेतकरीहितासाठी राजीनामा देऊन सत्तेच्या पदाला लाथ मारणार्‍या या नेत्याचा गुंज येथे सहपरिवार सत्कार आयोजित करण्यात आला होता, याच समारंभात झालेल्या जाहीर सभेत मुलाचे नाव ठेवण्यात आले, हे विशेष. हे सर्व मांडण्यामागील उद्देश हाच की रविकांत तुपकर यांनी कधीच कोणता ईव्हेंट साजरा केला नाही. आयुष्यात शेतकरी चळवळ, शेतकर्‍यांना न्याय्य हक्क मिळवून देणे एवढ्याच एका ध्येयाने झपाटलेल्या माणसाने अनेक आंदोलने केली, तडीपार झाला, पोलिसांच्या लाठ्या अंगावर झेलल्या, तुरुंगात गेला पण आपल्या मार्गापासून कधीच हटला नाही. २०१४ मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तुपकरांना आर्थिक विकास महामंडळाचे अध्यपद मिळाले. त्यांच लाल दिव्याची गाडी पहिल्यांदा त्यांच्या दारात नव्हे तर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या दारात उभी राहिली होती. हा सत्तेचा वाटा आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला अर्पण करतो, असे सांगत वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचे पहिले मानधन त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांना दिले होते, हे विशेष.

सध्या वाढदिवस ईव्हेंट म्हणून साजरा करण्याचे फॅड आले आहे. परंतु रविकांत तुपकर त्याला अपवाद आहेत. आजवर त्यांनी कधीच आपला वाढदिवस साजरा केला नाही. कधी पोस्टर नाही, बॅनर नाही, तामझाम नाही किंवा कोणता कार्यक्रम नाही. यंदाही १३ मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या लाखो चाहत्यांचा, कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह असतो परंतु तुपकरांनी कधीच त्याला संमती दिली नाही आणि यावेळी ते देणार नाहीत. आपल्या नावाप्रमाणेच कष्टकर्‍यांच्या जीवनातील अंध:कार दूर करण्याचा वसा घेतलेले ‘रवि’कांत तुपकर म्हणूनच कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. आदर्श नेतृत्वाच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा तरी काय द्याव्यात…शेतकर्‍यांची ही मुलुखमैदानी तोफ देशाच्या सभागृहात शेतकर्‍यांसाठी धडाडावी, याच मनस्वी सदिच्छा…..!

(लेखक हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक असून, बुलढाणा आवृत्तीचे प्रमुख आहेत. संपर्क ८८०५२०२२७६)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!