Breaking newsBULDHANAChikhaliCrimeHead linesVidharbha

एसपींचे आदेश धाब्यावर; चिखलीत खुलेआम वरली-मटका सुरू!

– चिखलीतून हलतात संपूर्ण तालुक्यातील अवैधधंद्यांची सूत्रे?

चिखली (महेंद्र हिवाळे) – कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे, त्याचबरोबर अवैधधंद्यांना आळा घालणे व त्यावर वारंवार कारवाई करून पोलिसांचा धाक कायम ठेवणे, हे पोलिसांचे काम आहे. परंतु, चिखली शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून, या अवैध धंद्यांना कुणाचे अभय आहे? आणि महिनाकाठी चालणारे कलेक्शन कुणाच्या खिशात जाते? याचा जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी शोध घेण्याची गरज आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये चिखली शहरामध्ये तर ठीकठिकाणी वरली मटक्यांची दुकाने थाटली गेली असल्याचे दिसून आले. तसेच, अनेक गोपनीय माहिती नाव उघड न करण्याच्या अटीवर संबंधितांनी दिली आहे.

चिखलीत वरली-मटका सुरू असल्याचे हे घ्या पुरावे. चेहरे मुद्दामहून ब्लर केले आहेत. चिखली पोलिस व एलसीबी कधी छापे टाकणार आहे? कारण आमची ही बातमी प्रसारित होताच हे अवैध धंदेवाले पसार होतील.

चिखली पोलिस व गुन्हे शाखेच्या नाकावर टिच्चून हे अवैध धंदे सुरू आहेत का? आणि याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? हे प्रश्न चिखली शहरात निर्माण झालेले आहेत. पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, चिखली तालुका व शहरात हे आदेश अक्षरशः धाब्यावर बसवले गेले असल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये आढळून आले आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने केलेल्या पाहणीनुसार, चिखलीतील आठवडी बाजारात काही अंतरावर २५ ते ३० दुकाने ही वरली मटक्याची थाटली गेली आहेत. या दुकानांत टेबल, खुर्च्या, मोठमोठे चार्ट लागले आहेत. ही दुकाने चिखली पोलिसांना माहिती नाही, असे नाही. तरीही पोलिस त्यांच्यावर कारवाई का करत नाही? या अवैध धंद्यावाल्यांनी आम्हाला दिलेल्या गोपनीय माहितीनुसार, या भागातून दरमहा मोठे कलेक्शन होत असून, हे कलेक्शन कुणाच्या खिशात जात आहे? हा प्रश्न आहे. चिखलीतील अवैध धंदे शहर पोलीस ठाणे, गोपनीय शाखा, स्थागिक गुन्हे शाखा (एलसीबी) यांना दिसत नाही का? हा प्रश्न आहे.

वरली-मटक्यांची दुकाने रहदारीच्या भागात आहेत. अनेक दारूडे, गर्दुले या दुकानांत बसून असतात, तसेच रस्त्याने ये-जा करतात, त्यामुळे महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच, या अवैध धंद्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद््ध्वस्त झालेले आहेत. चिखली ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्याने शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात येत असतो, व दिवसाढवळ्या त्याच्या खिशावर दरोडा घालण्याचे काम हे अवैध धंदेवाले करत असतात. त्यामुळे शेतकरी व मजूरवर्ग यांच्यात घरात या अवैध धंद्यामुळे वाद निर्माण होत असून, त्यांची मोठी आर्थिक लूटही सुरू आहे. अनेकजण वरली-मटक्याच्या नादी लागून बरबाद झाल्याने आत्महत्यादेखील केलेल्या आहेत.

नुकतेच जिल्ह्याला लाभलेले नवनियुक्त पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान सोडलेले आहे. कोणताही नवा एसपी आला की लोकप्रियता मिळविण्यासाठी असे फर्मान सुरूवातीला सोडतच असतो. नंतर सारेकाही अ‍ॅडजेस्ट करून घेत असतो, अशा प्रकारचे वक्तव्य हे अवैध धंदेवाले खासगीत बोलताना करत आहेत. त्यामुळे एसपींच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांच्या वरदहस्ताने त्यांनी त्यांचे धंदे चालूच ठेवलेले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची पोलिस अधीक्षक कडासने यांची खरेच इच्छा असेल तर त्यांनी चिखलीतील वरली-मटका बंद करण्याचे आव्हान स्वीकारावे, व हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!