– एनडीएमजेचे तहसीलदारांना निवेदन
चिखली (तालुका प्रतिनिधी) – मौजे आन्वी येथील बौध्द समाज बांधवाना जबर मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करावी, व फरार आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यात यावे, या आशयाचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीजच्यावतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना तहसीलदार चिखली यांच्यामार्फत देण्यात आले. तसेच, या प्रकरणात बौद्ध बांधवांवर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
मौजे आन्वी ता.चिखली जि.बुलडाणा येथील बौध्द समाज बांधवांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या जमिनीवर गेल्या ४० ते ५० वर्षापासून अतिक्रमण करुन आपली उपजिवीका भागवीत होते. परंतु सुरुवातीच्या काळापासून गावातील जातीयवादी लोकांनी त्यांच्या जमिनी शासकीय नियमानुसार हस्तांतरीत होऊ दिल्या नाहीत. जाणुनबुजून जातीयद्वेष भावनेतून आन्वी येथील बौद्ध बांधवांना नाहक त्रास देत आले आहे. त्याची पुनरावृत्ती म्हणून दि. ३० जून २०२२ रोजी बौध्द समाज बांधव हे आपल्या अतिक्रमीत शेतीत शेतीकामे करीत असतांना आन्वी गावातील पोलीस पाटील व ग्रामसेवक पवार यांनी बौध्द बांधव व महिलांना जबर मारहाण करीत, जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार चिखली पोलीसांनी विविध कलमान्वये अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे. परंतु बौध्द बांधवांची कोणत्याही प्रकारची चुकी नसतांना त्यांच्यावर खोटे व चुकीचे अन्यायकारक गुन्ह्याची नोंदसुध्दा चिखली पोलीस प्रशासनाने केली आहे. त्यामुळे मौजे आन्वी येथील बौध्द बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, तसेच जातीवादी पोलीस पाटील व ग्रामसेवक पवार हे फरार असल्यामुळे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज बुलडाणा जिल्ह्याच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, यावी नोंद घ्यावी. असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
यावेळी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीजचे विदर्भ सचिव भारत गवई, विदर्भ कायदेविषयक सल्लागार अॅड. रुचिता जाधव, जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे, जिल्हा समन्वयक सौ. आशाताई भारत कस्तुरे, तालुका सदस्य विरसेन साळवे, युवती तालुका अध्यक्ष अश्विनी मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
—————-