– ब्लॅक लिस्टमधील ठेकेदारला दिली तब्बल २२ कोटींची कामे!
सोलापूर (संदीप येरवडे) – जलजीवन मिशन योजनेतील गोंधळ संपता संपेना झाला आहे. एकाच ठेकेदाराकडे अनेक कामे तर पाण्याचे स्त्रोत नसताना केवळ पाईपलाईन दाखवून कामे उरकण्याचा घाट अभियंत्यांनी घातल्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाची गाडी पुढे सरकेना झाली आहे. ब्लॅकलिस्टमधील ठेकेदारला २२ कोटींची कामे दिल्यामुळे जलजीवनच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कामाच्या गतीबाबत सीईओ दिलीप स्वामी संतप्त झाले व सोमवारी बैठकीत त्यांनी अधिकार्यांची हजेरी घेतली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीत सीईओ स्वामी यांनी संबंधित अधिकार्यांना कामे वेळेत पूर्ण करा, कामाचा दर्जा राखा, अशा नेहमीच्या सूचना दिल्या. परंतु या सूचनाचे आता गांभीर्य ना अभियंत्यांना आहे ना ठेकेदाराना आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण जल जीवन मिशन योजनेच्या कामातील तक्रारी आणि त्रुटी याबाबत अनेकवेळा गाव पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक हे संबंधित अधिकार्यांना धारेवर धरत आहेत. तरी त्याचे फारसे मनावर न घेता आपला रेटा सुरू ठेवण्याचे काम सध्या अधिकारी करीत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हर घर नळ ही योजना प्रत्यक्षात साध्य होईल का? याबाबत संशय निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, येणारी विधानसभा, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यासाठी निधी दिला आहे. परंतु, प्रत्यक्षात त्या पद्धतीचे कामे न झाल्यास त्याचा फटका सत्ताधार्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, जल जीवन मिशन योजना राबविण्यासाठी गाव पातळीवरील सरपंच किंवा ग्रामसेवक यांना विश्वासात न घेताच इस्टिमेट केले आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत नाहीत, परंतु केवळ पाईपलाईन करून ही योजना राबवायचे मनसुबे अधिकार्यांचे दिसत असल्यामुळे अनेक गावांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सीईओ यांना मसुरीवरून तिकडेच जायला सांगणारे बाबा कारंडे हेदेखील आता शांत झाले आहेत. सांगोल्यातील जल जीवन मिशन योजनेमधील अनिमितता पुराव्यानिशी देणारे शेकापचे नेते बाबा कारंडे यांनी आता याबाबत दोन दिवसांनी सीईओ दिलीप स्वामी यांना भेटतो, अशी भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांनी जलजीवन मिशन योजनेतील चुकीच्या कामाबाबत बोट दाखवत जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. तसेच सीईओ स्वामी यांना मसुरीवरून तिकडचे जावे, त्यांनी सोलापूरला येऊ नये, असे वक्तव्य केले होते. परंतु तेच बाबा आता शांत झाले आहेत. त्यामुळे या कामांच्याबाबतीत संशय आणखीन वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी सोमवारी पाणीपुरवठा अधिकार्यांची बैठक घेतली व वर्कऑर्डर देऊनही कामे सुरू करण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला. गटविकास अधिकार्यांनी या कामाची पाहणी न केल्याबद्दल त्यांना नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण उशिरा जाग आल्यामुळे आता ओरडून काय उपयोग, प्रत्यक्ष कृती हवी, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
श्रीराम सोनी यांना २२ कोटीची कामे कशासाठी?
श्रीराम सोनी या ठेकेदाराला महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. जीवन प्राधिकरणनेही सोनी यांच्या कामावर शेरे मारलेले आहेत. ब्लॅकलिस्टमुळे सोनी यांना शासकीय कामे घेता येत नाहीत. परंतु त्याच ठेकेदाराला जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन योजनेची जवळपास २२ कोटीची कामे कशी दिली, असा सवाल लोकशासन पार्टीचे कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी उपस्थित केला आहे.
ज्या गावांमध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे त्या गावासाठी पाण्याचे स्रोत घेतले नाही. कारण त्यासाठी पूर्वीची प्रादेशिक योजना आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये केवळ पाईपलाईनचे काम आहे.
– सुनिल कटकधोंड, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा