‘केरल स्टोरी’प्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट; हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला पोलिसांची नोटीस
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगाव येथील एका टॉकिजमध्ये ‘द केरला स्टोरी’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी खामगावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते रोहित पगारिया यांना शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे त्यामध्ये बजावले गेलेले आहे. खामगाव हे अतिसंवेदनशील शहर आहे. त्यामुळे खामगाव पोलिस अॅलर्ट मोडवर आलेले आहेत. विशेष बाब म्हणजे, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये, पाेस्ट यांची स्वतःहून दाखल घेण्याचे आदेश यापूर्वीच सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत.
शहरातील युवा हिंदू प्रतिष्ठानचे रोहित पगारिया यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. ती बाब काहींनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावरून पोलिसांनी पगारिया यांना नोटीस दिली आहे. त्यामध्ये ७ मे रोजी शहरातील एका टॉकिजमध्ये ‘द केरला स्टोरी’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. खामगाव शहर संवेदनशील आहे, त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर केली जाईल, असे शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.