बुलढाणा (खास प्रतिनिधी) – चिखली मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार तसेच तरुण – तरुणींच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र शासनाने येत्या १२ मे रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर हा अतिशय उपयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे. यामधून युवकांना आपल्या करिअरविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे हे शिबीर युवकांसाठी एक प्रकारे टर्निंग पाँईंट ठरणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने सर्वतोपरी परिश्रम करावे, तसेच युवकांनी देखील या कार्यक्रमाला भरभरून उपस्थिती लावावी, असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले. दि. ६ मे रोजी शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रमाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष सुधीर तांबट, सदस्य अजय कोठारी यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष सागर पुरोहित तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस डी गंगावणे यांनी केले तर सूत्रसंचालन निदेशक सोनवणे यांनी केले.
युवकांनी शिबीराद्वारै करिअरला योग्य दिशा द्यावी – आ. महाले
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अश्या शिबीरांचे आयोजन केले जात आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार युवक तसेच इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना आपल्या करिअरसंभंधी अचूक व सविस्तर मार्गदर्शन आणि समुपदेशन होईल, यासाठी संबंधित विषयातील नामांकित तज्ञांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आ. श्वेताताई महाले यांनी दिली. जास्तीतजास्त गरजू युवकांनी या शिबीरामध्ये उपस्थित राहून आपल्या करिअरला योग्य दिशा द्यावी असेही त्या यावेळी म्हणाल्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सूचना आ. श्वेताताई महाले यांनी या बैठकीत उपस्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व निदेशकांना दिल्या.
काय असेल शिबिरात ?
स्थानिक श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दि. १२ मे रोजी सकाळी १० वाजता आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात येईल. जागतिक कौशल्याची व्याप्ती आणि रोजगाराच्या संधी, दहावी व बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया या विषयांवर विशाल नरवाडे (I.A.S.), समीर वानखेडे (I.R.S.), डॉ. आनंद पाटील (संचालक स्टडी सर्कल, मुंबई) व डॉ. सतिष तांबट (Phd) हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय कलमापन चाचणी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती, करिअर प्रदर्शनी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांचे व महिला बचतगटांचे स्टाँल्स देखील इथे लावण्यात येणार आहेत.