दारूबंदीसाठी घोन्सरच्या महिला पोलिस ठाण्यावर धडकल्या!
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) – गावात अवैध दारुविक्रीचा सुळसुळाट झाला असून, ही दारूविक्री बंद करण्यात यावी यासाठी, घोन्सर गावातील संतप्त महिलांनी रिसोड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत धडक दिली. ही दारू तातडीने बंद करा, आमचे संसार वाचवा, असे साकडे त्यांनी पोलिसांना घातले. तातडीने दारू बंद केली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही महिलांनी पोलिसांना दिला आहे.
वाशिम जिल्ह्यातील घोन्सर येथे अवैध दारुविक्रीला उधाण आले असून, दारूमुळे तरुणवर्ग व्यसनाधीन बनला आहे. तसेच, अनेक महिलांचे संसार या दारूने उद्ध्वस्त केले आहेत. पोलिस व बीट जमादार या दारुविक्रीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज रिसोड पोलिस ठाण्यावर धडक दिली व गावातील दारू तातडीने बंद करण्याची मागणी केली. महिलांच्या या मोर्चाने गावातील दारूअड्डे ताबडतोब उद््ध्वस्त करा, ही दारू ताबडतोब बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. मोर्चेकरातील काही महिलांनी थेट वाशिमच्या एसपींनाही फोन लावला, व तुमच्या पोलिसांना आमच्या गावातील दारू तातडीने बंद करण्यास सांगा, अशी विनंतीही केली.
घोन्सरसह परिसरात अवैध दारुचा ऊत
केवळ घोन्सरच नाही तर परिसरातील अनेक गावांत अवैध दारूचा ऊत आला असून, पोलिस अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. या दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अगदी शाळकरी मुलेही दारू पिताना आढळून येत आहेत. रिसोड पोलिसांनी तातडीने दारूबंदीसाठी हालचाल करण्याची गरज निर्माण झाली आहे.