ChikhaliHead linesVidharbha

सत्ताधार्‍यांनी सूडबुद्धीचे राजकारण न करता सुसंस्कृतपणा जोपासावा!

– ऐतिहासिक विजयाच्या शिल्पकारांच्या आभार मेळाव्याला लोटली अलोट गर्दी
– गद्दारांना मतदारांनीच धडा शिकविला – प्रा. नरेंद्र खेडेकर
– शेतकरीहित जोपासून आता बाजार समितीचे उत्पन्न वाढवू – साै. रेखाताई खेडेकर

चिखली/ बुलढाणा (संजय निकाळजे) – कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १० पैकी ७ बाजार समित्यांवर मतदारांनी टाकलेल्या विश्वासातून महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. या निवडणुकी दरम्यान राज्यातील सत्तेत असणार्‍यांनी विरोधकांवर वापरलेली सर्व शस्त्रे बाद करीत, सत्तेत नसतांनाही चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने दिलेला विजय हा ऐतिहासीक आहे. या विजयाच्या शिल्पकारांचे आभार मानण्याबरोबरच बाजार समितीच्या निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीला राज्यात बळ दिले, तर दुसरीकडे विरोधातील भाजपा व शिंदे गटाचा सुपडासाफ केला, हा विजय महाविकास आघाडीवर मतदारांनी दर्शविलेला विश्वास व महाविकास आघाडीतील एकजुटीचा परिणाम आहे. यातून सत्ताधार्‍यांनी सूडबुध्दीचे राजकारण न करता, सुसंस्कृतपणा जोपासावा, असा मौलिक सल्ला बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी राजकीय विरोधकांना खास करून चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांचा नामोल्लेख टाळून त्यांना दिला.

अत्यंत चुरशीच्या तितक्याच धक्कादायकरित्या पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडी बळीराजा पॅनलचे ११ उमेदवारांची उमेदवारी विरोधकांनी केलेल्या कारवाईतून रद्द ठरली असतांना बळीराजा पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी एकतर्फी कौल देत १७ जागी प्रचंड मतांनी विजयी केले. ऐतिहासीक विजयाचे शिल्पकार असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अडते, व्यापारी तसेच ज्यांनी या निवडणुकीत जिवाचे रान केले अशा सर्व घटकांचे आभार मानण्याकरिता चिखलीत आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविकास आघाडीतील घटक असलेल्या प्रमुख नेत्या माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शेतकरी नेते एकनाथराव थुट्टे, आदी प्रमुख मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

याप्रसंगी राहुल बोंद्रे म्हणाले की, या निवडणुकीत विरोधकांनी विविध आमिषे देत पैसाचा पाऊस पाडला. तरी मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे बळ उभे करून भाजप व शिंदे गटाचा सुपडासाफ केला. माझ्या राजकीय वाटचालीत मी अनेक निवडणुका लढलो, जिंकलो. मात्र बाजार समितीच्या ऐतिहासीक विजयाने मला बळकटी दिली. निवडणुकी दरम्यान विरोधकांनी केलेल्या दबावतंत्राला न जुमानता मतदारांनी एकजुट व एक दिलाने भक्कपणे महाविकास आघाडीला बळ दिले. जिल्ह्यातील बाजार समितीत्यांपैकी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक मताधिक्याने मतदारांनी ऐतिहासीक विजय मिळवून दिला. हे केवळ एकजुटीमुळेच शक्य झाले असून, आम्ही सुडबुध्दीचे राजकारण करण्यापेक्षा थेट मतदारांशी संपर्क साधला. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले असल्याचे सांगून विराधकांनी दुसर्‍याची रेषा पुसण्यापेक्षा स्वतःची रेषा मोठी करावी, येत्या काळात शेतकरीहित जोपासून बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी वचनबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी राहुल बोंद्रे यांनी संचालकांच्यावतीने केले.

याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर म्हणाले, या निवडणुकीत दबावतंत्राचा वापर करणार्‍या सत्ताधार्‍यांबरोबरच गद्दारी करणार्‍यांना मतदारांनी धडा शिकविला आहे. विरोधकांनी वाटप केलेले पाकिटे, साड्या, अधिकारी वर्गाचा वापर हे सारेकाही फोल ठरले. राज्यातील घडत असलेल्या घटनांच्या तिरस्कारातून त्रस्त झालेल्या मतदारांनी केलेल्या एकतर्फी मतदानातून बळीराजाच्या १७ विमानांनी भरारी घेतल्याचे व येत्या काळात बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे प्रा. खेडेकर यांनी सांगितले. माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर म्हणाल्या की, राज्यासह जिल्ह्यात व चिखलीतही मतदारांनी महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलला भरघोष मतांनी विजयी केले. येत्या काळात शेतकरीहित जोपसण्याबरोबरच समितीचे उत्पन्न वाढविणे तसेच मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्यात.

याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शेतकरी नेते एकनाथराव थुट्टे यांचीही घणाघाती भाषणे झाली तर बाजार समितीचे माजी सभापती विष्णू पाटील कुळसुंदर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचीत संचालकांच्यावतीने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे विशालकाय हार घालून स्वागत करण्यात आले तर नवनिर्वाचीत संचालक पांडुरंग पाटील भुतेकर, समाधान सुपेकर, श्रीकिसन धोंडगे, डॉ. संतोष वानखेडे, रामभाऊ जाधव, समाधान परिहार, रामेश्वर खेडेकर, संतोष वाकडे, गणेष थुट्टे, सौ. कमलताई कुळसुंदर पाटील, श्रीमती मंदाबाई भुतेकर, मनोज लाहुडकर, परमेश्वर पवार, श्रीकृष्ण मिसाळ, संजय गवई, जय बोंद्रे, नीरज चौधरी यांनी सभा ठिकाणी मोठ्या स्ांख्येने उपस्थित असलेल्या मतदार बंधु-भगिनींवर पुष्पवृष्टी करून त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विष्णू पाटील कुळसुंदर यांनी, संचलन डॉ. संतोष वानखेडे तर आभार डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी मानले. ज्योतीताई खेडेकर, दीपक देशमाने, नंदु वर्‍हाडे, डॉ.इसरार, विश्वासराव खंडागळे, अतहरोद्यीन काझी, संजय गाडेकर, कुणाल बोंद्रे, नंदुभाऊ शिंदे, सचिन बोंद्रे, दीपक म्हस्के, सुनिल तायडे, गजानन लांडे पाटील, अशोकराव पडघान, ज्ञानेश्वर सुरूशे, सुभाष देव्हडे, बिंदूसिंग इंगळे, जगन्नाथ पाटील, रवि तोडकर, भगवानराव काळे, दत्ता सुसर, प्रमोद पाटील, दिलीप वानखेडे, विनायक सरनाईक, डॉ. भगवान उंबरकर, मनोज खेडेकर, लखन गाडेकर, शेषराव कानडजे, विष्णू मुरकुटे, अरूण खडके, किशोर कदम, माणिकराव खांडवे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. स्नेहभोजनाने या मेळाव्याची सांगता झाली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास मिसाळ, इसरूळचे सरपंच सतीश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने बाजार समितीच्या मतदारांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीदेखील उपस्थिती होती.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!