Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPolitics

शरद पवारांचा राजीनामा फेटाळला!

कोर कमिटीचा प्रस्ताव शरद पवारांना सादर, पवारांनी मागितला वेळ!

पक्षाच्या काेर कमिटीने मंजूर केलेल्या ठरावावर शरद पवार यांनी विचार करण्यास वेळ मागितला आहे. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. शरद पवार यांनी काेर कमिटीतील सदस्यांचे म्हणने ऐकून घेतले आहे. त्यामुळे ते आता निर्णय घेणार आहेत. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. देशभरात शरद पवार यांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी मागणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 


– पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहण्याची कोर कमिटीची पवारांना विनंती
– पक्षाने राजीनामा फेटाळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचा एकच जल्लोष

मुंबई (पुरूषोत्तम सांगळे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला पदाचा राजीनामा पक्षाच्या १६ सदस्यीय कोर कमिटीने फेटाळून लावला आहे. पवारसाहेबांनी पक्षाला विश्वासात न घेता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांची विनंती लक्षात घेता, पक्षाने पवारसाहेबांचा राजीनामा नामंजूर केला आहे. त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करावा, अशी पक्षाने त्यांना विनंती केली आहे. पक्ष व देशाला पवारसाहेबांची गरज असून, त्यांनी आपल्या पदावर कायम रहावे. केवळ पक्षांतर्गतच नाही तर अन्य राजकीय पक्षांनीदेखील शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी विनंती केली आहे. या सर्व बाबी पाहाता, पक्षाच्या १६ सदस्यीय कोर कमिटीच्या बैठकीत पवारसाहेबांनी दिलेला राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय एकमताने घेतला असल्याची माहिती कोर कमिटीचे सदस्य तथा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पटेल यांच्या या माहितीनंतर यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी, नेते यांनी एकच जल्लोष केला.

राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तसेच कोर कमिटीतील निमंत्रक म्हणून माझे नाव असल्याने या ठरावाबाबत आपण सर्वांना माहिती देत आहोत, असे सांगून प्रफुल्ल पटेल म्हणाले, की शरद पवारांनी ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अचानकपणे निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आम्ही अवाक झालो होतो. देश, राज्य आणि पक्षाला शरद पवारांची गरज आहे. त्यामुळे त्यांचा हा निर्णय एकमताने नामंजूर करण्यात आला असून, त्यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावेत, अशी आमची इच्छा आहे, असे पटेल म्हणाले. यावेळी कोर कमिटीच्या बैठकीतील ठराव प्रफुल्ल पटेल यांनी वाचून दाखवला. कोर कमिटीची बैठक सुरू होताच, प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद पवार हेच तहह्यात राष्ट्रीय अध्यक्ष ठेवण्याचा ठराव मांडण्यात आला. शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच पवार हेच राष्ट्रीय अध्यक्षपदी ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. कोर कमिटीचे हे ठराव शरद पवार यांना कळवले जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या या बैठकीस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, पीसी चाको, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत इतर कोणताच ठराव मांडला नाही. कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पर्यायी अध्यक्ष कोण असावा, यावर एका शब्दानेही चर्चा झाली नाही. फक्त चार ओळींचा ठराव मांडून शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

‘लोक माझे सांगती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. पवार साहेबांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली. या समितीची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला की, आदरणीय खा. शरद पवार साहेबांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. पक्षाध्यपदी पवार साहेबांनीच राहावे अशी विनंती सर्वानुमते करण्यात येत आहे. हा ठराव पवार साहेबांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडण्यात येईल. त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.

  • प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय उपाध्यक्ष


राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत आज सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. यावेळी भिवंडी येथील राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस आणि इतर कार्यकर्त्यांनी वेळीच सतर्कता दाखवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या बैठकीसाठी अजित पवार हे पक्ष कार्यालयाच्या परिसरात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा सुरु केल्या. ‘देश का नेता कैसा हो…शरद पवार जैसा हो…’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अजित पवार यांनी कोणतीही रिअ‍ॅक्शन न देता पक्षाच्या कार्यालयात निघून गेले.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!