Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम राहणार?

– राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास अजित पवार यांचा नकार!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सर्वाधिक चर्चेत आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम ठेवत, खासदार सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षपदी निवड करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचेही हे खात्रीशीर सूत्र म्हणाले. उद्या, ५ मेरोजी पक्षाच्या कार्यालयात अध्यक्ष निवड समितीची बैठक होणार असून, या बैठकीत या विचारांवर शिक्कामोर्तब होईल. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्यासह निवड समितीचे इतर सदस्य या बैठकीला हजर राहणार आहेत. दरम्यान, समितीचा जो निर्णय येईल, तो आपणास मान्य असेल, असे शरद पवार यांनी सांगितले असून, दुसरीकडे आपण पक्षाचे अध्यक्ष होणार नाही, असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनाला बसले आहेत. कार्यकर्ते आणि नेत्यांचा आग्रह लक्षात घेऊन शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासंदर्भात फेरविचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता मोठी अपडेट समोर आली. शरद पवार हेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार असून, पक्षाच्या कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती विश्वासनीय सूत्राने दिली आहे. उद्या, ५ मेरोजी सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याबाबत प्रफुल पटेल हे प्रस्ताव मांडतील, आणि इतर नेते अनुमोदन देतील, अशी माहितीदेखील या सूत्रांने दिली. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला नाही तर तुम्ही अध्यक्ष होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता, त्यावर अजितदादा म्हणाले, की माझा अध्यक्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केले तरीही मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. माझा तसा विचारदेखील नाही, मी त्या पदावर काम करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

प्राप्त परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी शरद पवारांनी घेतलेला पुढाकार कायम ठेवावा, अशी सर्व विरोधी पक्षांची भूमिका आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जाबाबदारी सांभाळावी आणि एक कार्याध्यक्ष नेमावा, असा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात कार्याध्यक्षालाही तयारी करायला वेळ मिळेल. हा प्रस्ताव शरद पवारदेखील स्वीकारतील, असेही सांगण्यात आले. त्यामुळे २ मेरोजी शरद पवारांनी घेतलेला निर्णय ते मागे घेणार का, हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. विशेष म्हणजे, मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आज शरद पवार यांनी त्यांच्यासोबत बातचीत केली. यावेळी तुमच्या मनासारखा निर्णय होईल. तुमच्या भावनांचा अनादर करणार नाही. तुम्हाला दोन दिवसांनी पुन्हा असे बसावे लागणार नाही, असे आश्वासन पवार यांच्याकडून देण्यात आले. त्यामुळे शरद पवार हेच अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!