आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील अनेक नद्यांचे प्रदूषण वाढले असून इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी, मुळा मुठा, पवना, तापी यासह इतर अनेक तीर्थक्षेत्रा मधील नद्या कंपन्यांचे केमिकल, रसायन मिश्रित सांडपाणी थेट नद्यांत जात असल्याने नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांचे स्वच्छतेची केवळ घोषणा न राहता नद्या स्वच्छ व पावित्र्य जतन करण्यासाठी शासनाने प्राधान्य देण्याची मागणीसाठी वेळ प्रसंगी भाविक,वारकरी यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा खणखणीत इशारा भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिला आहे.
आळंदीत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधित इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि सहकारी यांनी ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोरील महाद्वार प्रांगणात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला भागवत धर्म प्रसारक समिती व पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत भिसे , सचिव ॲड विलास काटे , अर्जुन मेदनकर , गौतम पाटोळे, वैजिनाथ ठवरे, भागवत काटकर यांचेसह विविध सेवाभावी संस्थानच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देण्यात आला. या प्रसंगी साखळी उपोषणात सहभागी होत भिसे यांनी मार्गदर्शन केले.
भिसे म्हणाले , संतांनी तीर्थक्षेत्रात स्नानाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. देहू, आळंदी, पंढरपूर, नाशिक आदी तीर्थक्षेत्रावर दररोज हजारो भाविक येतात . पवित्र नद्यांचे स्नान करतात. देवाचे, संतांचे दर्शन करीत स्थान माहात्म्य जोपासत आहेत. मात्र अलीकडच्या काळात राज्यातील अनेक नद्यांचे प्रदूषण खूप वाढले असल्याने नद्या प्रदूषित झाल्या आहेत. यामुळे भाविक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने नद्यांचे पाणी प्रश्न करीत आहेत. नमामी चंद्रभागा घोषणा झाली आहे. मात्र अजून काम सुरु परंतु काम काहीच नाही . शासनाने आषाढी पुर्वी या नद्यांचे शुध्दीकरण हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भिसे यांनी दिला. आंदोलनास पाठिंबा देण्यास आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष , नगरसेवक , विविध संस्थाचे , संघटनांचे अध्यक्ष , पदाधिकारी , महाराज मंडळी व असंख्य वारकऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट देवून पाठिंबा जाहिर केला.