Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले!

– प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह कायकर्ते ढसाढसा रडले, निर्णय मागे घेण्यासाठी हात जोडून उभे राहिले!
– कार्यकर्त्यांनी भावूक होऊ नये, साहेब निर्णय मागे घेणार नाहीत – अजित पवार

मुंबई (पुरूषोत्तम सांगळे/प्राची कुलकर्णी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले आहे. पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांनी १७ एप्रिलरोजीच पुढील १५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात दोन भूकंप होणार असल्याचे सांगितले होते. त्या विधानाच्या बरोबर सोळाव्या दिवशी, आज १२.४५ मिनिटांनी पहिला राजकीय भूकंप झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे पवारांनी ‘लोक माझ्या सांगाती’ या स्वतःच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मुंबईत जाहीर केले, अन् अख्ख सभागृह काही कळायच्याआत हादरून गेले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर विचारपीठावरच रडायला लागले. पदाधिकारी, कार्यकर्ते हात जोडून निर्णय मागे घ्या, अशी विनवणी करताना दिसले. पवारांच्या या अनपेक्षित घोषणेने महाराष्ट्रदेखील हादरून गेला आहे. प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घेण्याची विनंती केली. जयंत पाटलांना यावेळी बोलताना अश्रू अनावर झाले. तुमचा राजीनामा आम्हालाच नाही तर देशातील कुणालाही मान्य होणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावेळी जयंत पाटील आणि शरद पवार भावनिक झालेले दिसले.

जयंत पाटील हे बोलण्यासाठी उठले. मात्र भावनिक झालेल्या जयंत पाटलांच्या शब्द बाहेर पडले नाहीत. त्यानंतर जयंत पाटील पुन्हा खाली बसले. यावेळी जयंत पाटलांना आधार देताना इतर नेते दिसले. आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही पवार साहेबांच्या नावाने मते मागितली. पवार साहेबच बाजूला गेले तर आम्ही लोकांसमोर कुणाच्या नावाने जायचे, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांच्या नावानेच ओळखला जातो. साहेब परस्पर निर्णय घेण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुमचा हा निर्णय आम्हालाच नाही तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीला मान्य होणारा नाही. तुम्ही निर्णय मागे घ्यावा, तुमच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही हवा आहे, असे आवाहन जयंत पाटलांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचे सांगतानाच, यापुढे निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणादेखील शरद पवार यांनी केली. १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असे सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असे पवार म्हणाले. सार्वजनिक जीवनात कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. ‘माझ्या सहकार्‍यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी सहा दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू, आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल, असेही पवार याप्रसंगी म्हणाले.

चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली होती. त्यानंतर आजचा हा निर्णय आल्याने स्वतःला दूर करून शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा सुरू होती. पक्षाचा नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी समिती गठीत केली जात असल्याचेही पवारांनी जाहीर केले. १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे तत्कालिन नेते पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांना सोबत घेऊन पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तेव्हापासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पवारांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रडापड सुरू केल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले, की शरद पवार साहेब यांनी वयाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. ते पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतील. ते अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षात नाही, असे काहीही नाही. साहेब आता निर्णय परत घेणार नाहीत, तेव्हा कार्यकर्त्यांनी भावूक होऊ नये. पक्ष जो कुणी अध्यक्ष निवडेल, आम्ही सर्व त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू, असेही अजित पवारांनी स्पष्ट करत, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना धीर दिला.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, केके शर्मा,पीसी चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे व जयदेव गायकवाड यांचा समावेश आहे. ही समिती आता पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडणार आहे. शरद पवार यांनी लेखी स्वरुपात आपला राजीनामा पक्षाकडे सोपविलेला आहे.


‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसंच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पदावरून पायउतार न होण्याचे आवाहन केले. मात्र, त्याचवेळी अजित पवार यांनी शरद पवार आपली भूमिका बदलणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
————-

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. पवार साहेब निर्णय मागे घ्या, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो..! अशा घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शरद पवार यांच्या या निर्णयानंतर बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नाझेर काजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  बुलढाण्या पाठोपाठ धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.


हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता – अजित पवार

साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे, आपण सर्व त्या अध्यक्षाला साथ देऊ, आपण त्याच्या पाठीशी उभं राहू. कोणीही अध्यक्ष झालं तरी ते साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे, जे सांगायला नको. काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नकोय, हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच हा निर्णय जाहीर करणार होते पण काल वज्रमूठ सभा होती. म्हणून आज त्यांनी हा निर्णय जाहीर केला.


“शरद पवार यांनी घेतलेला निर्णय तो कोणत्या परिस्थितीत आणि का घेतला याचं विश्लेषण तेच करु शकतात. पण त्यांच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही राजीनामा दिला होता. पण लोकमतामुळे त्यांना पुन्हा शिवेसनाप्रमुखांचा राजीनामा मागे घ्यावा लागला. असे नेते निर्णय अनेकदा एका विशिष्ट परिस्थित घेतात. शरद पवार यांनी तशा परिस्थित तो घेतला असेल”, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!