Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

निवडणुका लावा, अमित शाहांना जमीन दाखवू!

– उद्धव ठाकरे, अजित पवार भाजप-शिंदे सरकारवर तुटून पडले!
– हे लोकांच्या मनातील नाही तर गद्दारी करून आलेले सरकार – अजित पवार

– 6 तारखेला बारसूत जाणार, जाहीर सभा घेण्याचा ठाकरेंचा निर्धार

मुंबई (प्राची कुलकर्णी) – हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते आहे. महापालिकेच्या निवडणुका लावा, जिल्हा परिषदेच्या लावा, किंवा लोकसभेच्या लावा. नाही तर तीनही निवडणुका एकत्र लावा. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा असा ठोसा लावू की, जमीन काय असते, ते अमित शाहांना दाखवू, असा खणखणीत इशारा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला दिला. ‘मी येत्या ६ तारखेला बारसूत जाऊन बोलणार आहे. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी ६ तारखेला बारसूला जाणार मग महाडच्या सभेला जाणार, अशी मोठी घोषणाही ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांच्या नाकावर टिच्चून केली. मुंबईतील बीकेसी मैदानावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी जमलेल्या विराट गर्दीला संबोधित करताना ठाकरे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही दमदार भाषण झाले. ‘हे लोकांच्या मनातील सरकार नसून गद्दारी करून आलेले सरकार आहे’, असे टीकास्त्र पवारांनी यावेळी सरकारवर डागले. याप्रसंगी शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, खा. संजय राऊत आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राला ६३ वर्षे झाली. मराठी माणसांनी मुंबई ही राजधानी लढाई करुन मिळवली, ती आंदण मिळालेली नाही. १ मे सुरु झाल्यापासून तिथं सजावट केली जाते पण काल सरकारकडून किंवा महापालिकेकडून कसलीही सजावट करण्यात आली नव्हती. तिथं सजावट शिवसैनिकांनी केली, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांनी सत्ताधारी आणि राणे कुटुंबीयावर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या दिल्याचे समर्थन करत नाही. मग तुमचे टीनपाट मला, आदित्य आणि कुटुंबाला शिव्या देतात, तेव्हा का बोलत नाही. तुमच्या टीनपाटावर बूच घाला. तुमची लोक वाटेल ते बोलणार, मग आमची लोक पण बोलणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
याप्रसंगी अजित पवार यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, की ‘हे लोकांच्या मनातलं सरकार नाहीये. हे दगाफटका देऊन निर्माण झालेलं सरकार आहे, गद्दारी करून आलेलं सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने अशी गद्दारी कधी सहन केलेली नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसा नाहीये. महापुरुषांचे आदर्श आपल्या समोर आहेत. परंतु आज या महापुरुषांच्या महाराष्ट्रात अतिशय चुकीचा कारभार चाललेला आपण पाहत आहोत, असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर सरकार कोसळेल आणि अजित पवार भाजपच्या साथीने मुख्यमंत्री बनतील, अशा चर्चांना गेली १५ दिवस ऊत आला होता. आज त्याच चर्चांचे आणि अफवांचे मळभ अजित पवार यांनी दूर केले. महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर, नागपूरनंतर आज तिसरी वङ्कामूठ सभा राजधानी मुंबईत पार पडली. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सभेला उपस्थित होते. अजित पवार या सभेला येणार का? अशा चर्चा असतानाच त्यांची सभेला एण्ट्री झाली. त्यावर खासदार संजय राऊत यांनीही कोटी केली. दादा सध्या लक्षवेधी आहेत. सभेला येणार… आपल्या भाषणाने सभा जिंकणार, असे राऊत म्हणाले. यावर अजितदादांनाही हसू अनावर झाले. त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार भाषण केले. सध्याच्या सरकारच्या काळात राज्यात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली. कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. यांना आता जागा दाखवण्याची वेळ आलीये, असा एल्गार करतानाच माझ्यासंबंधाने मीडियात काही चर्चा सुरु आहेत. पण त्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही यावेळी अजित पवारांनी केले.


एकनाथ शिंदेंच्या चुकांचा अजितदादांनी वाचला पाढा!

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चुकांचा पाढा वाचत जोरदार खरडपट्टी काढली. मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान द्रौपदी मुर्मू म्हणतात, असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदेंना द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याशिवायही शिंदेंकडून झालेल्या चुकांची यादीच अजित पवारांनी वाचली. ‘मागे एमपीएससी आणि निवडणूक आयोगातही घोटाळा करून टाकला होता. ते घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे काही सुटायला तयार नाही. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,’ असेही अजित पवारांनी नमूद केले.
—————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!